top of page
Search

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा… विठ्ठलाच्या आरतीचा नेमका अर्थ माहीत आहे का ? Know the exact meaning of Yuge Atthawise Witewari Ubha... विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास

Updated: Oct 16, 2025

Statue of Hindu God Vishnu with golden crown, Diwali Lakshmi Pujan दिवाळी लक्ष्मी पूजन, intricate design.

🕉️श्रीविठ्ठल सुकरुणार्णवमाशुतोष दीनेष्टपोषमघसंहतिसिन्धुशोषम् । श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परं तं वन्दे दुरन्तचरितं हृदि संचरन्तम् ॥१॥

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा… विठ्ठलाच्या आरतीचा नेमका अर्थ माहीत आहे का ? Know the exact meaning of Yuge Atthawise Witewari Ubha...विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास

आरतीमधील प्रत्येक शब्द हा विशिष्ट अर्थाने उपयोजिलेला असतो. दोन दिवसावर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीचा अर्थ जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल…

आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही पूजा विविध आरत्या हौशीने आणि भक्तिभावाने म्हटल्या जातात. आपण वर्षानुवर्षे आरत्या ऐकत आलेले असतो, त्यामुळे त्या सहजरित्या पाठ झालेल्या असतात. परंतु, या आरत्यांचे अर्थ आपल्याला माहीत असतात का ? आरतीमधील प्रत्येक शब्द हा विशिष्ट अर्थाने उपयोजिलेला असतो. दोन दिवसावर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीचा अर्थ जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल…

विठ्ठलाच्या आरत्या

एकाच देवतेच्या दोन-तीन आरत्या आपल्याला सहजरित्या दिसतात. विठ्ठल देवतेचेही तसेच आहे. संत नामदेवांची रचना असलेली ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही आरती सर्वांना माहित आहे. तसेच ‘येई हो विठ्ठले माझे माउली ये’, ‘आरती अनंतभूजा’, ‘संत सनकादिक भक्त मिळाले अनेक’, ‘ओवाळू आरती माझ्या पंढरीराया’ याही विठ्ठलाच्या आरत्या प्रसिद्ध आहेत. संत नामदेव, संत एकनाथ महाराज यांच्या या रचना आहेत.

‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ आरतीचा अर्थ

‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही आरती सर्वांना तोंडपाठ असते. परंतु, ‘युगे अठ्ठावीस’ म्हणजे किती युगे ? सर्वांना ४ युगे माहीत असतात. सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे अध्यात्मामध्ये मानलेली आहेत. अशी एकसहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असे म्हणतात. त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात; म्हणजेच सुमारे ७१ चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो. त्यालाच मन्वंतर असे नाव आहे. ब्रह्मदेवाचे आयुर्मान १०० ब्राह्मवर्षे एवढे असते. त्यातील ५० ब्राह्मवर्षे संपून ५१ व्या वर्षातला पहिला श्वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे. त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून, सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली, तर आताचे कलीयुग हे अठ्ठाविसावे युग आहे. विठ्ठल अठ्ठावीस युगे आहे, म्हणजेच वैवस्वत मन्वंतरापासून तो आहे. सृष्टीच्या आधीपासून विठ्ठल विटेवर उभा आहे. ‘वामांगी रखुमाई’ म्हणजे विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रखुमाई आहे. विठ्ठल रखुमाई यांच्या युगल मूर्तींमध्ये ती डाव्या बाजूला दिसते. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा पुंडलिक आणि विठ्ठलाच्या दर्शनाची कथा इथे अपेक्षित आहे. परब्रह्म म्हणजे विठ्ठल. भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी विठ्ठलाने अवतार घेतला. चरणी भीमा नदी जगाचा उद्धार करण्यासाठी वाहत आहे. भीमा नदी म्हणजेच चंद्रभागा नदी. महाराष्ट्रातील पवित्र नद्यांमध्ये तिची गणना होते. या नदीत स्नान केल्यावर संसारतापातून मुक्तता होते, अशी श्रद्धा आहे.

रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा म्हणजे काय ?


आपल्याला विठ्ठलाची पत्नी रखुमाई/रुक्मिणी माहीत आहे. मग ‘राईच्या वल्लभा’ का म्हणतात ? ‘राई’ हे पाठभेद असू शकतात. राहीच्या वल्लभा असे त्याचे मूळ रूप आहे. राही म्हणजे राधा होय. आता राधा आणि विठ्ठलाचा काय संबंध ? तर विठ्ठल ही देवता विष्णूचा अवतार मानली जाते. विष्णू आणि लक्ष्मी हे शाश्वत युगल आहे. विष्णूच्या कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी ही त्याची पत्नी आणि राधा ही आध्यात्मिक आदिबंधात्मक प्रेयसी होते, असे मानले जाते. यावरून रुक्मिणी कृष्णावर रागावली होती, या कथा हरिवंशकथांमध्ये दिसतात. कृष्णाचा पुढील अवतार विठ्ठल असे दशावतारांमध्ये मानले जाते. त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण यांच्या रुपक कथांमध्ये साम्य दिसते.रुक्मिणी आणि विठ्ठल यांची मंदिरे वेगवेगळी असण्याचेही हे कारण आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या आरतीमध्ये रखुमाईसह राई/राहीचा उल्लेख आहे. अजून एक संदर्भ असा मिळतो की, राईच्या वल्लभा म्हणजे पृथ्वीच्या वल्लभा होय.

गरुड हनुमंत पुढे उभे रहाती म्हणजे काय ?

विठ्ठलाच्या आरतीच्या दुसऱ्या पदामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन आहे. तुळशीमाळा त्याच्या गळ्यात आहेत. दोन्ही कर (हात) कटी (कमरेवर) ठेवलेले आहेत.कासे (कमरेला) पीतांबर (पिवळ्या रंगाचे सोवळ्यासारखे वस्त्र) परिधान केले असून लल्लाटी (कपाळावर) कस्तुरीचा टिळा लावला आहे.

(विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परब्रह्माच्या) भेटीकरिता देव सुरवर (श्रेष्ठ देवदेवता) नित्य येत असतात. गरुड आणि हनुमंत नेहमी हात जोडून त्याच्यासमोर उभे असतात. हे वर्णन आणि विष्णूचे वर्णन यामध्ये साम्य आहे. तुळशीपत्र विष्णूला अत्यंत प्रिय आहेत. विष्णू देवता पीतांबर धारण करते. हनुमंत या देवतेचा इथे उल्लेख आहे. कारण, विष्णूचा सहावा अवतार प्रभू श्रीराम आहेत. श्रीरामांसमोर हनुमंत (दास मारुती) कायम असतो. विष्णूच्या नवव्या अवतारात विठ्ठलाला गृहीत धरले जाते. त्यामुळे प्रभू श्रीरामांचा दास असणारा हनुमंत याही अवतारात विठ्ठलासमोर दिसतो. गरुड हे विष्णूचे वाहन आहे. त्यामुळे विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानलेला असल्यामुळे गरुडाचाही इथे उल्लेख दिसतो.

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती की ओवाळू आरती सुरवंट्या येती ?

आरत्यांमध्ये अनेक पाठभेद झालेले दिसतात. काही लोक सुरवंट्या म्हणतात. परंतु, मूळ शब्द ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती असा आहे. कुर्वंड्या म्हणजे द्रोणातील दिवे होय. वारकरी, भक्तजन कुर्वंड्या म्हणजे द्रोणातून दिवे घेऊन येतात आणि ते चंद्रभागेमध्ये सोडून देतात. पुढे नामदेव म्हणतात, दिंडी, पताका, ध्वज घेऊन भक्तगण, वारकरी आनंदाने देहभान हरपून नाचत असतात. असा हा पंढरीचा महिमा महान आहे.

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ही ओळ आरत्यांमध्ये समान दिसते का ?

विठ्ठलाच्या आरतीमधील शेवटच्या पदामध्ये वारीचे वर्णन आहे. आषाढी कार्तिकीला वारकरी येतात. चंद्रभागेमध्ये म्हणजेच भीमानदीत स्नान करून पवित्र होतात. ‘दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति’ श्री विठ्ठलाच्या सहज लीलेने क्षणभर झालेल्या दर्शनाने एका क्षणात ते भवसागरातून मुक्त होतात. मुक्त होणे म्हणजे मृत्यू नव्हे. आत्यंतिक आनंद, समाधान, राग-लोभ आदी गोष्टींपासून मुक्तता म्हणजे मुक्ती होय. संत नामदेवांनी गणपतीच्या रचलेल्या आरतीमध्ये…’ हा चरण दिसतो. ‘दर्शनहेळामात्रे गंधपुष्पेदुर्वा तुजला जे वाहती। ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती। दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती। सहज नामा याणे गायिली आरती। तेच चरण विठ्ठलाच्या आरतीमध्ये दिसतो.

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।केशवासी नामदेव भावे ओवाळिती… इप्सित देवतेचे दर्शन हे भक्ताला मुक्तिप्रद, आनंद देणारेच असते.

आपण वेगवेगळ्या आरत्या आनंदाने म्हणतो. परंतु, त्यांचा अर्थ जाणून म्हटल्या तर त्या देवतेविषयीचा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होईल. कारण, अर्थ जाणून केलेली कोणतीही कृती ही फलदायी असते.

Statue of Lord Vitthala adorned with flowers and Diwali Lakshmi Pujan दिवाळी लक्ष्मी पूजन PANDITJIPUNE

विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते ? काय आहे विठ्ठल देवतेचा इतिहास:

सर्वांची प्रिय अशी विठूमाऊली असली, तरी विठ्ठल हे नामकरण कसे झाले, वैष्णव, शैव आणि बौद्ध संप्रदायाचा विठ्ठलाशी कसा संबंध आहे, विठ्ठल देवतेच्या उत्पत्ती कथा, पंढरपूरची व्युत्पत्ती हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल. आज आषाढी एकादशी. विठ्ठल नामघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. विठ्ठल देवतेच्या आणि भक्तांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. परंतु, विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते आहे, याविषयी कमी चिकित्सा होते. सर्वांची प्रिय अशी विठूमाऊली असली, तरी विठ्ठल हे नामकरण कसे झाले, वैष्णव, शैव आणि बौद्ध संप्रदायाचा विठ्ठलाशी कसा संबंध आहे, विठ्ठल देवतेच्या उत्पत्ती कथा, पंढरपूरची व्युत्पत्ती हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल.


कथा ‘विठ्ठल’ आणि ‘पंढरपूर’ नावाची…

महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत, महाराष्ट्रातील भागवत-वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल हे आहे. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशी अन्य नावेही आहेत. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका खांबावर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’ असा केलेला आढळतो. ‘पंडरगे’ हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे. या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली असण्याची शक्यता आहे.

विठ्ठलाला पांडुरंग असेही म्हणतात. ‘पांडुरंग’ हे नाव ‘पंडरगे’ या मूळ क्षेत्रनामावरून आले. ‘पांडुरंग’ या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होतो. विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ या शब्दापासून आलेला असावा, असे म्हटले आहे. या व्युत्पत्तीनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते, ‘विष्णू’ या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले, असे म्हटले आहे. ‘शब्दमणिदर्पण’ या कन्नड व्याकरण ग्रंथाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राच्या आधारे विष्णूचे ‘विट्टु’ हे रूप होते, या रुपाला ‘ल’ प्रत्यय लावला की, ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, अशीही एक व्युत्पत्ती दिसते. विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह्‌ णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा तो विठ्ठल अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’ ‘म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल, अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय यांनी दिली आहे. इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची मराठीतील बोलीभाषेतील नामोच्चारणे आहेत. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’असा असल्याचे प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.

श्रीविठ्ठलाला ‘कानडा’ का म्हणतात ?

विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी विठ्ठलाला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी विशेषणे उपयोजिली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असे लिहिले आहे. ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेलेआहेत. ‘कर्नाटकु’ या शब्दाचा कर्नाटक प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकू’ म्हणजे ‘करनाटकू’ वा ‘लीला दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत, या गोष्टीही ‘कानडा’ म्हणण्यास कारण ठरू शकतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

विठ्ठल देवतेचे प्रकटन कसे झाले ?

विठ्ठल देवता पंढरपूरला प्रकटण्याची सर्वमान्य कथा म्हणजे भक्त पुंडलिकाची कथा. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ती स्वीकारलेली आहे. पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा आहेत. त्यातील एक म्हणजे डिंडिरव वनातल्या डिंडीरव याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमा नदीकाठी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध असावा, अशी शक्यता आहे. दुसरी कथा म्हणजे, कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली मैत्री सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून दिंडीरवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. तेव्हा त्याने गाईगोपाळांना गोपाळपूरला ठेवले. 

पंढरपूरजवळ गोपाळपूर नावाची वाडी आहे. वारीमध्ये या गावाला भेट दिली जाते. तिसरी कथा म्हणजे, पद्मा नावाच्या एका सुंदर तरूण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णू तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तिच्या समोर प्रकट झाले. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. लखूबाई ही रुसून आलेली रुक्मिणी समजण्यात येते. या तीन कथांपैकी डिंडीरवाची व रुसून पंढरपूरला आलेल्या रूक्मिणीची कथा पांडुरंगमहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कंद पुराणात, पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कंद आणि पद्म अशा दोन्ही पुराणात आलेली आहे.


विठ्ठल देवता आणि व्यंकटेश, बुद्ध, जिन

पंढरपूरची विठ्ठल देवता आणि तिरूमलाई (आंध्र प्रदेश) येथील व्यंकटेश या दोन देवांमध्ये साम्य आहे. विठ्ठलाप्रमाणेच व्यंकटेश हा हाती शस्त्र नसलेला आणि शांत आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात त्याच्या भक्तांना वर देत आहे. विठ्ठलाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत. पांडुरंगमाहात्म्यांप्रमाणेच व्यंकटेशाशी संबंधित संस्कृत माहात्म्य ग्रंथ आहेत. रूसलेल्या रूक्मिणीची समजूत काढण्यासाठी कृष्ण (विठ्ठल) पंढरपूरला आले. त्याचप्रमाणे व्यंकटेशही रूसलेल्या लक्ष्मीसाठी तिरूमलई येथे आले, अशी कथा सांगितली जाते. विठ्ठल आणि व्यंकटेश या दोन्ही देवांना कांबळे (जाड घोंगडे) अत्यंत प्रिय आहे. व्यंकटेश देवता वेंकटाचलावर एका चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारूळातून प्रकट झाली, अशी कथा सांगितली जाते. पंढरपूर येथील दिंडीरवन हे चिंचेच्या झाडांचे वन होते. अशी या देवतांसंदर्भात साम्यस्थळे आहेत.

मराठी संतांनी अनेकदा विठ्ठलाला बुद्ध वा बौद्ध म्हटले आहे. संत जनाबाईंनी एका अभंगात असे म्हटले आहे की, कृष्णावतारी कंसवध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे. तसेच, विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे, असे एकनाथांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे. विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे, अशी काही संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठ्ठलाचे चित्र दाखविलेले दिसते आणि त्या चित्राखाली ‘बुद्ध’ असेही छापलेले आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशवमंदिरात कोरलेल्या दशावतांरांत बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

विठोबा हे जैनांचे दैवत आहे, असा जैनांचा दावा अठराव्या शतकापर्यंत होता, असे दिसते. मराठी संतांनी मात्र विठ्ठलाला अनेकदा बुद्ध म्हणून संबोधिले असले, तरी जिन म्हणून कधीही संबोधिलेले नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी त्यांच्या भरतखंडाच्या अर्वाचीन कोशात एका जैन पंडिताने जैन तीर्थंकर नेमिनाथाच्या स्थापन केलेल्या मूर्तीचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक एका जैन ग्रंथातून उदधृत केले आहेत. ते वर्णन पंढरपूर येथील विठ्ठलाच्या

Statue of Lord Vitthal, adorned with flowers and garlands in temple setting.

मूर्तीशी जुळते, असे त्यांनी म्हटले आहे. कृष्ण आणि नेमिनाथ यांचा संबंध जैन परंपरेत जवळचा मानला गेला आहे. दोघेही यदुवंशीय असून चुलतभाऊ होते, असे ही परंपरा सांगते. त्यामुळे ज्याला कृष्णाचे बालरूप मानले जाते, त्या विठ्ठलात जैनांनी नेमिनाथांना पाहिले असणे शक्य आहे. रा. चिं. ढेरे यांनी विठ्ठल देवतेचा विशेष अभ्यास करून वरील संदर्भ दिले आहेत.डॉ. रा. चिं. ढेरे यांनी विठ्ठलाचे वर्णन ‘महासमन्वय’ असे केले आहे. विठ्ठलाची विकसनप्रक्रिया आणि त्याची विविध रूपे पाहून ते सत्य वाटते.

Text in Devanagari script, Vande, Samcharanam, and more, explaining scripture.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2026 

bottom of page
https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false