top of page
Search

नवरात्रव्रत-विधीमागील शास्त्रीय मीमांसा कोणती?

6 days ago
6 min read

नवरात्रव्रत-विधीमागील शास्त्रीय मीमांसा कोणती?


उत्तर: ‘अनाचारेण मालिन्यं अत्याचारेण मूर्खता । विचाराचारयोर्योगः सदाचारः स उच्यते ॥’ अर्थात, आचारहीनतेमुळे जीवनास मालिन्य, तर आचाराधिक्यामुळे मूर्खता येते. विचार व आचार ह्यांचा चपखल मेळ म्हणजेच सदाचार होय. ज्या-ज्या काळात दैत्यदानवांनी अनाचार व अत्याचाराच्या रूपाने भूमीवर थैमान घातले, त्या-त्या वेळी आदिशक्तीने दुर्गारूपातील विविध अवतार घेतले आणि सत्प्रवृत्त जनांची त्या आपत्प्रसंगातून मुक्तता करून सद्धर्म व सदाचार ह्यांची तिने संस्थापना केली. शक्तिदेवीच्या महत्कृत्यांची दिव्य स्मरणगाथा म्हणून साजरा केला जाणारा दुर्गामहोत्सव भारतभर कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात प्रचलित आहे. वर्षभर विविध ऋतुकालांत संपन्न होणाऱ्या दुर्गापूजेमध्ये शरद ऋतूमधील आश्विन शु॥ प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केला जाणारा नवरात्रमहोत्सव विशेष लक्षणीय आहे. कारण श्रीदुर्गासप्तशती ग्रंथातील ‘शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी ॥’ (अ. १२.१२) ह्या मंत्रानुसार देवीनेच ह्या शारदीय महोत्सवाचे (महापूजेचे) महत्त्व निर्धारित केलेले आहे. शारदीय महोत्सव संपूर्ण भारतातील बहुतेक कुटुंबांत कुलधर्मस्वरूपात संपन्न होतो. हा महोत्सव नऊ दिवसांचा असल्यामुळे त्यास ‘नवरात्र’ असे संबोधले जाते. ह्या कालामध्ये संपन्न होणारी दुर्गापूजा आपापल्या कुलस्वामिनीच्या (उदाहरणार्थ: तुळजाभवानी, सप्तशृंगनिवासिनी, करवीरनिवासिनी, एकवीरा, कामाक्षी, रेणुका इत्यादी) स्वरूपांत केली जाते.


नवरात्रात नंदादीप, घट, पुष्पमाला व बीजारोपण (शेत) ह्या चार महत्त्वाच्या गोष्टी असून त्या कोणत्या ना कोणत्या तरी तत्त्वाचे द्योतक होत. त्या अनुषंगाने नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे, घट हे आपल्या नाशवंत देहाचे, घटातील जल हे त्यातील चैतन्याचे, पुष्पमाला हे सत्कार्यांनी सुगंधित झालेल्या मानवी जीवनसूत्राचे, तर बीजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतीक आहे. ह्या सर्वांच्या समन्वयाचे गूढार्थाच्या दृष्टिकोनातून समालोचन केल्यास त्यामध्ये एक उदात्त संकल्पना दिसून येते.


शारदीय नवरात्रामागील कथानकानुसार देवीने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. हा महिषासुर सद्यःकालीदेखील सर्वसामान्य मानवाच्या अंतर्मनात ह्या ना त्या विकाराच्या रूपाने कमीजास्त प्रमाणात थैमान घालत असून तोच मानवाच्या अधोगतीस कारणीभूत होत असतो. नवरात्राचे औचित्य साधून आपणांस त्या विकाररूपी महिषासुराचा निरास करावयाचा असतो. ज्याप्रमाणे नऊ दिवसांच्या युद्धानंतर देवीकडून महिषासुराचे पारिपत्य झाले, त्याप्रमाणे आपल्यातील षड्विकाररूपी असुरांच्या नाशाची जिद्द मनी बाळगून नवरात्रातील नऊ दिवस देवीच्या सान्निध्यात यथामति आराधना केली असता ते उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होते. ह्यास्तव नवरात्रातील घटस्थापनेमध्ये आपल्या विकारवश व नाशवंत देहाचे प्रतीक म्हणून एक मातीचा घट घेऊन त्यामध्ये जलाच्या माध्यमातून वरुणरूपी चैतन्याची स्थापना केली जाते. हाच घट देवीसान्निध्यात म्हणजेच देवीस्वरूप नंदादीपाजवळ ठेवला जातो. त्यासमीप एका पत्रावळीवर मृत्तिकेच्या वेदिकेवर नवनिर्मितीचे प्रतीक म्हणून बीजारोपण केले जाते. येथे मानवी देहाचे मृत्तिकेमध्ये विलीनीकरण व परत मृत्तिकेतून पुनर्निर्माण ही सृष्टिचक्रातील वास्तवता सूचित होते. त्या नऊ दिवसांत इकडे षड्विकाररूपी असुरांची शकले उडत असतात, तर तिकडे बीजारोपण झालेल्या धान्यातून नवांकुरांसारखे जीवात्म्यांचे उन्नयन होत असते. (गव्हांकुररसामध्ये अत्यंत पोषक अशा जीवनसत्त्वांचा अनमोल साठा असून त्याच्या नित्य सेवनाने वार्धक्यप्रक्रिया मंदावते.) ह्या नऊ दिवसांत दररोज मालाबंधन करण्यात येते. ह्या सूत्ररूपी मालेच्या साहाय्यानेच साधकाचा जीवात्मा हा आपल्या देहरूपी घटाशी जोडलेला असतो हे ध्वनित होते. ज्याप्रमाणे गर्भस्थित भ्रूण नऊ महिन्यांच्या खडतर तपश्चर्येनंतर यशस्वीरीत्या जन्मास येतो, त्याप्रमाणे नऊ दिवसांच्या ह्या समरप्रसंगानंतर साधकातील कामक्रोधरूपी असुरांचा निःपात होऊन साधकाचा जणू नव्याने जन्म झालेला असतो. आपल्यातील आसुरी वृत्तीवर मिळवलेला विजय हा नवरात्रानंतर येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो.


हिंदुधर्मातील सर्व वर्णीयांत प्राचीन कालापासून चालत आलेला नवरात्रमहोत्सव त्यांच्या-त्यांच्या प्रथेनुसार साजरा केला जात असे. क्षात्रवर्णीय लोक धर्मावर संकट आणणाऱ्या आसुरी वृत्तींच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी सीमोल्लंघनानंतर युद्धाचा आरंभ करीत असत. ह्या कार्यास प्रेरणा मिळावी म्हणून नवरात्रामध्ये बलीची प्रथा समाजाने रूढ केली असावी, तथापि सद्यःकालीन बदललेली समाजरचना पाहता सर्व वर्णीयांसाठी पशुबली नव्हे तर आपल्यातील विकाररूपी असुरांचे दमन अपेक्षित असल्याकारणाने हिंसेचा निषेध सर्व स्तरांवर करणे हेच खरे धर्माचरण ठरते. ‘धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥’ (मनुस्मृती ६.९२) अर्थात, धैर्य, क्षमा, मनोदमन, परोपकार, शुचित्व, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, विद्या, सत्य आणि शांती ही धर्माची दहा लक्षणे आहेत. जे धर्माचरण उपरोक्त कसोटीस उतरत नाही, ते शास्त्रबाह्य ठरवून त्यामध्ये योग्य दिशेने बदल केला पाहिजे.


शारदीय नवरात्राच्या धर्तीवरच राम, नृसिंह, कृष्ण, व्यंकटेश, ज्योतिर्लिंग, सिद्धनाथ, विठ्ठल, मल्लारी, दत्तप्रभृती देवांच्या, त्याचप्रमाणे शाकंभरीप्रभृती देवींच्या अन्य कालावधीतील प्रचलित झालेल्या महोत्सवांनाही ‘नवरात्र’ असे संबोधले जाऊ लागले. ‘नवरात्र’ ह्या शब्दातील ‘नव’ हे पद जरी संख्यावाचक असले तरी ह्या नवरात्रांतील व्रताचरण नऊ दिवसांचे असेलच असे नाही. सर्वसाधारणपणे हा कालावधी सहा दिवसांपासून बारा दिवसांपर्यंत असतो. कारण ह्या विविध देवदेवतांचे अवतारकार्य हे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले होते. त्यामध्ये मुख्यतः दैत्यांपासून भक्तजनांचे रक्षण होण्यासाठी किंवा भक्तजनांवर कोसळलेल्या आपत्तींच्या निवारणासाठी ह्या देवतेने अवतार घेतलेला होता. ह्या अवतारकार्याच्या पूर्ततेसाठी जेवढा कालावधी लागला त्यानुसार त्या-त्या देवतेचे नवरात्र संपन्न होते.


उपरोक्त मूळ संकल्पना मनी बाळगून नवरात्रमहोत्सव साजरा केल्यास मानवातील विकारवशता क्षीण होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती तर होईलच, पण त्याचबरोबर समाजसंस्थाही अधिकाधिक निकोप व एकसंध होण्यास साहाय्य होईल.


नवरात्राच्या विधिविधानातील महत्त्वाची अंगे कोणती? त्या वेळी आचरण कसे असावे? नवरात्रकाळात अशौच आल्यास त्यास परिहार कोणता?


उत्तर: नवरात्राचे विधिविधान - नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवघर व देव्हाऱ्याची साफसफाई करून देवमूर्तीचे उन्मार्जन (स्वच्छता) करून घ्यावे. ह्यानंतर संकल्प करून घटस्थापन (वरुणस्थापन), वेदिकास्थापन व त्यानंतर दीपस्थापन झाल्यानंतर मुख्य देवतेचे अभिषेकासहित षोडशोपचारपूजन करावे, ताम्हणात तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पीठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करून नंतर मालाबंधन करावे, मध्याह्नी महानैवेद्य दाखवून आरती करावी व प्रथेनुसार दांपत्य, कुमारी इत्यादिकांना अन्नसंतर्पण करावे. महोत्सवकालामध्ये दररोज जलप्रोक्षण करून (फुलाने पाणी शिंपडून) पूजा व मालाबंधन करावे व यथाशक्ति देवीआराधना करावी.


नवरात्रोत्थापनाच्या दिवशी जलप्रोक्षणाने पूजा, मालाबंधन व नेहमीची देवीउपासना झाल्यावर ‘मातः क्षमस्व’ किंवा ‘देव क्षमस्व’ अशी प्रार्थना करावी. नंतर त्या देवतेचा घोष करून (उदाहरणार्थ: ‘दुर्गायै नमः’, ‘व्यंकटेशाय नमः’, ‘मल्लारिमार्तंडाय नमः’) देवतेच्या ईशान्य दिशेस एक फूल वाहून देवप्रतिमा त्या दिशेकडे किंचित हालवावी. व्यंकटेशाचे व जोतिबाचे नवरात्र देवीच्या शारदीय नवरात्रकाळातच येत असल्यामुळे दोन्ही नवरात्रे दशमीस उठवण्याची प्रथा आहे. नवरात्र उठवल्यानंतर घट, शेतातील अंकुर, माळा ह्यांच्यावर अक्षता वाहून त्यांचे विसर्जन झाल्यावर घटातील जलाने घरातील सर्वांवर सिंचन करावे. ह्यानंतर दांपत्य-कुमारी-भोजन घालून वेळेच्या उपलब्धीनुसार त्याच दिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी देवतांचे उन्मार्जनपूर्वक षोडशोपचारपूजन करावे.


नवरात्रातील आचारपालन - धर्मशास्त्रदृष्ट्या आदर्श आचारसंहितेमध्ये पैशुन्य (चहाड्या करणे), चौर्यकर्म, असत्यभाषण, कलह करणे ह्या सर्वकालीन निषिद्ध गोष्टी सर्वथा वर्ज्य असतात. धार्मिक कार्यप्रसंगी मनाची संवेदनशीलता तीव्र असल्यामुळे कोणत्याही कटुगोड प्रसंगांचे पडसाद मनावर तत्काळ कोरले जातात. ह्यास्तव उपरोक्त निषिद्ध गोष्टी निदान धार्मिक कार्यप्रसंगी तरी घडणार नाहीत ह्या बाबतीत दक्ष असावे. त्याचप्रमाणे निषिद्धाहार, सामिषाहार व मद्यप्राशन ह्या गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात.


नवरात्रव्रताच्या बाबतीत संकल्पोक्त कामना अत्यंत उच्च कोटीतील असल्यामुळे त्यास पोषक अशा आचारपालनास अनन्यसाधारण महत्त्व असते. ह्या आचारपालनामध्ये उपरोक्त आचारसंहितेबरोबरच अन्य काही व्रताचारात्मक नियमांचा अंतर्भाव असतो. ही व्रताचारात्मक नियमावली कर्त्याबरोबरच घरातील सर्व कुटुंबीयांना लागू असते. तथापि सध्याच्या धकाधकीच्या गतिमान जीवनात, जागेच्या व वेळेच्या अभावामुळे आणि लौकिकात अप्रस्तुत ठरत असल्यामुळे त्यातील सर्वच गोष्टींचे काटेकोर पालन करणे काही वेळा व्यावहारिकदृष्ट्या गैरसोयीचे व कष्टप्रद ठरते. अशा वेळी अनिवार्य आचारपालन व कृताकृत (परिस्थितीनुसार करावयाचे) आचारपालन असे वर्गीकरण करणे क्रमप्राप्त ठरते. अनिवार्य आचारपालनामध्ये घरातील सर्वांनी निषिद्धान्न (कांदा, लसूण, शिळे अन्न इत्यादी) टाळणे व मस्तकावरील केशकर्तन न करणे तसेच विवाहितांनी एकशय्या वर्ज्य करणे ह्यांचा समावेश होतो. ह्याखेरीज कर्त्यांनी (उभयता पतिपत्नींनी) करावयाच्या अनिवार्य आचारपालनात परान्नभक्षण न करणे, पलंगावर व गादीवर न झोपणे, दिवसा निद्रा न घेणे आणि यथाशक्ति उपवास करणे ह्यांचा समावेश होतो. सर्व कुटुंबीयांनी करावयाच्या कृताकृत आचारपालनामध्ये श्मश्रु (फक्त दाढी-मिशा कापणे) व प्रस्थान (वेस उल्लंघणे) न करणे आणि पादत्राण न वापरणे ह्यांचा समावेश होतो. सद्यःकाली ह्या बाबतीत परिस्थितीनुसार निर्णय घेणे इष्ट ठरते. कर्त्या पतिपत्नीचा उपवास असला तरी देवांस नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा. अशा वेळी तो प्रसाद कुटुंबीयांतील अन्य व्यक्तींना घेता येतो.


उपरोक्त नियमावलीमधील पादत्राण न वापरणे, गादीवर न झोपणे अशा नियमांचे पालन म्हणजे एक प्रकारची तपस्याच असून ह्या तपाचरणामध्ये परंपरागत अन्य काही नियमांचा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार अंतर्भाव करता येतो. ह्या तपाचरणामुळे नवरात्राचे भरघोस फळ तर मिळतेच, पण व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही होते.


नवरात्र हा कुलधर्म असून त्यामध्ये खंड न पाडता निरलसपणे त्याचे पालन केल्यास त्या कुटुंबावर कुलदेवतेचे कृपाछत्र राहत असल्यामुळे त्या घरावर सहसा आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक संकटे येत नाहीतच, पण जरी आली तरी ती सुसह्य होऊन त्यांचे सहजगत्या निवारण होते. अनेक वर्षांच्या दीर्घ खंडानंतर नवरात्र नव्याने चालू करावयाचे झाल्यास कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन सांगणे (प्रार्थना) करून त्या वर्षापासून नवरात्रमहोत्सवास प्रारंभ करावा. खंडदोषपरिहारार्थ त्या देवतेचा यथाशक्ति जप करून सप्तशतीपाठ, पवमान/विष्णुसहस्रनाम, रुद्रपठन अशा प्रकारची पुरश्चरणात्मक उपासना करावी. तसेच शक्य झाल्यास चंडी, पवमान, रुद्र अशा प्रकारचे स्वाहाकार करावेत. विभक्त कुटुंबांत अन्य कुलाचारांप्रमाणे नवरात्रमहोत्सवदेखील स्वतंत्रपणे होणे आवश्यक असते.


नवरात्रकाळातील अशौचप्राप्ती - नवरात्र व अशौच (सोयर व सूतक) ह्यांच्या संदर्भात तीन पर्याय संभवतात. १) अशौच चालू असताना नवरात्र आले असता उपवासादी व्रताचार सुरू करून अशौचसमाप्ती होताच घटस्थापना करून नवरात्रप्रारंभ करावा. अशा वेळी नवरात्रमहोत्सवाचा कालावधी जरी घटत असला, तरी नवरात्राचे पालन होणे क्रमप्राप्त ठरते. २) नवरात्र चालू असताना अशौच आले असता घरातील ब्रह्मचारी मुलगा, कुलोपाध्याय किंवा आप्त (स्नेही) ह्यांच्याकडून नवरात्रातील पूजा, मालाबंधन इत्यादी नित्यविधी तसेच नवरात्रोत्थापन करवून घ्यावे. अशा वेळी आपल्या घरातील वा दुसऱ्याच्या घरातील (परान्न) शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे दुधसाखरेचा दाखवावा. स्वतःच्या उपवासादी व्रताचारामध्ये खंड पडू देऊ नये. नवरात्रसमाप्तीपूर्वी अशौचसमाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे स्वतः उपरोक्त विधी करावेत. ३) नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्यापूर्वी घरामध्ये निधनघटना घडून अशौच आले व ते नवरात्रसमाप्तीपर्यंत राहत असेल तर सपिंडीकरण होईपर्यंत कोणतेही देवकार्य करण्यास शास्त्रसंमती नसल्याकारणाने नवरात्रमहोत्सव करता येत नाही. तथापि उपवासात्मक व्रताचाराचे पालन करावे. अशौचसमाप्तीनंतर नवरात्र खंडित झाल्याबद्दल महाभिषेकपूर्वक पूजा व समाराधना करावी.


नवरात्रकाळातील श्राद्ध - शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामहश्राद्ध असते. सुवासिनी पुत्रवती स्त्रीस आपल्या दिवंगत पित्यास श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ह्या दिवशी दौहित्रश्राद्धरूपाने मिळत असते. ह्याविषयीचे, तसेच नवरात्रकाळातील सांवत्सरिक व प्रतिसांवत्सरिक श्राद्धविषयक विवेचन पुढे श्राद्धप्रकरणात आलेले आहे.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating*

©2026 

bottom of page
https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false