
दैव आणि कर्म: एक विचारविनिमय
- Vedmata Gayatri J & D Kendra

- Aug 24, 2025
- 3 min read
Updated: Nov 3, 2025
एका घरात वाढलेल्या दोन भावांचं आयुष्य एक गुन्हेगार बनला आणि दुसरा यशस्वी उद्योजक; नशीब आणि प्रयत्न यावर विचार करायला लावणारी गोष्ट!
वाचनात एक छान गोष्ट आली होती. एक पत्रकार त्याच्या कामाच्या निमित्ताने विविध लोकांशी संवाद साधायचा. एकदा त्याचं काही कारणाने कारागृहात जाणं होतं. तिथे त्याला कैद्यांशी संवाद साधता येतो. एका कैद्याचं म्हणणं त्याच्या विशेष लक्षात राहतं. तो सांगतो, की ‘‘आमच्या घरात सतत भांडणं आणि मला लागलेली संगत यामुळे मी बिघडत गेलो आणि गुन्हेगार झालो!’’ यावरून पत्रकार निष्कर्ष काढतो, की आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वाढतो, तसंच आपण वर्तन करतो. हे अगदी स्वाभाविक असतं.
पण पुढची गंमत अशी, की योगायोगाने हाच पत्रकार एका उद्योजकाची मुलाखत घेतो. त्याच्या व्यावसायिक पार्श्वभूमीचा विचार करताना, उद्योजक म्हणतो, ‘‘कसलं काय हो. घरात भांडणं आणि आजूबाजूची मुलं तशीच; पण म्हणूनच मी ठरवलं, की आपण आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं. उत्तम शिक्षण आणि संस्कारक्षम वातावरण त्यांना मिळावं. म्हणूनच मी जिद्दीनं शिकत, मिळतील ती कामं करत इथवर आलो.’’
पत्रकाराच्या लक्षात आलेली पुढची आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा कैदी आणि हा उद्योजक हे सख्खे भाऊ आहेत! गोष्ट एवढीच होती; पण विचार केल्यावर लक्षात आलं, की या गोष्टीकडे दोन दृष्टीनं पाहता येतं. एकतर घडणं आणि बिघडणं आपल्याच हातात असतं. इच्छा असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्नाने मात करून माणूस स्वतःचं आयुष्य घडवू शकतो.
दैव आणि कर्म: एक संतुलन
दूसरा दृष्टिकोन असा आहे की, या दोघांना त्यांच्या नशिबानुसार बुद्धी झाली. तसेच ते वागले. याच गोष्टीवर आपण नेहमीच चर्चा ऐकतो. काहीजण म्हणतात, की नशीब वगैरे काही नसतं. सगळं घडवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या मनगटात असतं. तर कुणी फक्त नशीबच मानतात. पण सगळंच आपल्या हातात नसतं हेही लक्षात येतं. प्रयत्नाला पर्याय नाही, हेही तितकंच खरं.
विद्यार्थ्याला बुद्धीची देणगी मिळाली तरी अभ्यास चुकत नाही. कलाकाराची प्रतिभा दैवी असेल तर साधना लागतेच. म्हणूनच दोन्हींचा संतुलित विचार आपल्याला जमिनीवर ठेवून उंचीवर नेऊ शकतो. दैव आणि कर्म वा प्रयत्न या दोन्हींच्या बाबतीत खूप काही विचारमंथन झालं आहे.
भर्तृहरींचे विचार
भर्तृहरींच्या नीतीशतकातही दोन्हींचा विचार केलेला आहे. एका श्लोकात भर्तृहरी एक छोटी गोष्ट सांगतात. डोक्यावर एकही केस नसलेला माणूस भरउन्हात सावलीसाठी एका झाडाखाली जातो. तर त्याच झाडाचं फळ पडून त्याचं डोकं फुटतं! संकटं दुर्दैवी माणसाचा पाठलाग करतात.
याच विभागात अजून एक सुभाषितरूपी कथा आहे. एका पेटीत एक साप बंदिवान झालेला आहे. तो भुकेला आहे आणि तिथून सुटका होण्याची, तसंच अन्न मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. तो संपणार असं आपल्याला वाटतं, तोच कलाटणी मिळते. एक उंदीर त्या पेटीला भोक पाडून जातो थेट त्या सर्पाच्या मुखात!
सगळं काही अशक्य वाटत असताना, त्याचं पोटही भरतं आणि उंदराने सुटकेचा मार्गही तयार केलेला असतो! हे वाचताना मनोमन पटतं, की हो, या अशा घटना आजही घडताना दिसतात. ‘देव तारी त्याला कोण मारी’ आणि ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ हे खरंच घडतं.
नशीब आणि प्रयत्न
कुठे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ होऊन एकाएकी होत्याचं नव्हतं झाल्याचं आजही आपण पाहतो. म्हणूनच सुभाषितं मनाला स्पर्शून जातात. दैव, नशीब, नियती काही म्हणा त्यापुढे भल्याभल्यांना हात टेकावे लागतात.
महादेवांचं उदाहरण सुभाषितकार देतात. कुळ, घराणं कुठलंही असो, नशीबात नसेल तर दमडीही मिळत नाही. सुभाषिताचा हा भावानुवाद -
स्वयं महेश, सासरे नगेश, सखा धनेश, पुत्र तो गणेश
तरी सदा भिक्षापात्र करी ईश्वरेच्छेपुढे कोण काय करी
तुकोबांनीही एका रचनेत अशीच नात्याची गुंफण फारच कमाल आहे. शंख हेदेखील दारिद्र्याचंच प्रतीक मानलं जातं.
भोग आणि लाभ
आता भोग किंवा लाभ हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळे असतात. सखू लक्ष्मीच्या घरी काम करायला जायची. तिला हेवा वाटायचा, की लक्ष्मी किती राणीसारखी राहते. मागायचा अवकाश, की हवं ते मिळतं.
याउलट लक्ष्मी मनात म्हणायची, की कसला हा सोन्याचा पिंजरा! यांना नोकरी न करणारीच सून हवी होती; पण मला त्यामुळेच मनासारखं जगता येत नाही. यापेक्षा ही सखू स्वतःचे निर्णय स्वतः घेते!
शेवटी सुदैव आणि दुर्दैव म्हणजे काय तर मनासारखे असणे वा नसणे! हेच दुःखाचं मूळ शांता शेळके एका ओळीत किती छान मांडतात पाहा -
‘मागते मन एक काही दैव दुसरे घडविते’
आपलं दुःख हे एखाद्याचं सुख असू शकतं. म्हणूनच आहे ते विनातक्रार स्वीकारलं, की मग मनाजोगत्या सुखासाठी आपण शांतपणे प्रयत्न करू शकतो.
दैव आणि कर्म यांचा समतोल
पण प्रयत्न करून नशिबात नसेल तर? हा प्रश्न पडलेला एक शिष्य गुरूंना विचारतो, की ‘‘दैव श्रेष्ठ की कर्म?’’ ते याला विचारतात, की ‘‘तुझं बॅँकेत लाॅकर आहे?’’ ‘‘आहे तर!’’ ‘‘किती किल्ल्या लागतात?’’ ‘‘दोन’’. ‘‘एक माझ्याकडे, एक त्यांच्याकडे.’’
एका किल्लीने उघडेल?’ ‘‘नाही.’’ तसंच कोणतंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी दैव आणि कर्म दोन्ही गरजेचं आहे. आपल्याकडे आहे ती प्रयत्नांची किल्ली आणि दैवाची किल्ली त्याच्याकडे.
निष्कर्ष
थोडक्यात, शंभर टक्के प्रयत्न केल्यावर हाती जे येतं त्याला नशीब म्हणतात. आधीच नशिबाला दोष देणं म्हणजे कर्तव्यात कसूर करणं. समर्थ रामदाससुद्धा प्रयत्नाचा किती पुरस्कार करतात पाहा -
‘अचूक येत्न करवेना। म्हणौन केले ते सजेना॥’
अपयशी होण्याचं कारण हे प्रयत्न कमी पडणं हेच अनेकदा असतं. म्हणूनच ‘यत्न तो देव जाणावा’ ‘केल्याने होत आहे रे’ ही त्यांची वचनं आपण शाळेपासून घोकतोय.
दैव आहेच; पण ते आपल्या हातात नाही! तेव्हा हातात असलेला प्रयत्न तोच शंभर टक्के करायला हवा. गरुडाने पंख पसरले नाहीत आणि झेप नशिबातच नव्हती असं म्हणलं, तर त्याला काय अर्थ आहे?
यथा ह्येकेन चक्रेण न रथस्य गतिर्भवेत।
एवं पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति॥
रथाला जसं एकच चक्र गतिमान करू शकत नाही, तसंच प्रयत्नाशिवाय माणसाचं भाग्यही फळत नाही. म्हणूनच आपल्या सर्वांच्याच स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांची कास धरूया आणि यशासाठी प्रार्थना करूया. शुभं भवतु!




Comments