top of page
Search

Shree Lakshmi Nrusinha Navratra


om नीरातटे कृत निकेतनम् अम्बुदाभम् प्रत्यङ्मुखं द्विभुजराजितमब्जनेत्रम्।

योगासनस्थममलम् सदयावलोकम् जनुद्वयाहितकरम् नृहरिं नमामि।।

वागीशा यस्य वदने लक्ष्मी यस्य च वक्षसि।

यस्यास्ति ह्रदये संवित् तं नृसिंहमहं भजे।।

पुण्यारण्ये नृसिंहैक नाम सिंहो विराजते।

यन्नादत: महा कल्मष कुंजरा:।।

स्वभक्त पक्ष पातेन तद्वक्षविदारणम्।

नृसिंहमद्भूतं वन्दे परमानन्द विग्रहम्।।

श्री गणेशाय नमः।। श्री सरस्वतयै नमः ।।श्री गुरुभ्यो नमः।।

हिरण्याकशिपूसह अनेक दुष्ट दैत्यांचा संहार करून जगाचे सज्जनांचे परित्राण करणाऱ्या व प्रल्हादावर कृपा करणाऱ्या नरसिंह अवताराचा कथेचा विस्तार व माहात्म्य प्रकट करतो.

जा लक्ष्मीने आपल्यावर अनुग्रह करावा एतदर्थ ब्रह्मादिकांचा यत्न चालला आहे. ती मुर्तीमती लक्ष्मी सुद्धा, ज्या वैकुंठा मध्ये, स्फटिकांच्या भिंतींनी युक्त असून मधून मधून शोभा आणण्याकरिता ज्याला सुवर्णाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत,अशा श्रीहरीच्या गृहामध्ये, आपला चंचल स्वभाव टाकून नृपुरांच्या योगाने आपले चरणकमल शब्द युक्त करीत करीत हस्ता मध्ये क्रीडेसाठी धारण केलेल्या कमला ने संमार्जन करीत आहे की काय? अशी पाहण्यात येते. अशा भगवान श्रीविष्णू च्या परमधामामध्ये वैकुंठा मध्ये एके दिवशी एक विचित्र घटना घडली. ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र सनत्कुमार, सनक, सनंदन आणि सनातन हे निरिच्छपणे आपल्या सत्य लोकातून निघून सर्व लोकांचे ठाई आकाश मार्गाने फिरत असत. ते चौघे फिरत-फिरत वैकुंठ पहाण्यासाठी वैकुंठात प्रवेश करतात. वैकुंठातील सहा चौक्या ओलांडून पुढे सातव्या चुकीच्या ठिकाणी सारख्या वयाचे हातात गदा धारण करणारे बहुमोलाची आभूषणे, कुंडले यांनी त ज्यांचा वेष सुंदर दिसत आहे असे दोन देव द्वारपाल पाहिले. त्या सनकादिक ऋषींनी सहा दरवाजे यांचे ठिकाणी पूर्वी जसा प्रवेश केला होता त्याचप्रमाणे सातव्या दरवाजे चे ठिकाणीही पाहत असणार्‍या त्या जय विजय नामक द्वारपालांस न विचारता त्यांनी आत प्रवेश केला. ब्रह्म निष्ठांचा कैवारी असा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंताच्या स्वभावाच्या उलट आहे अशा त्या दोघा द्वारपालांनी वृद्ध असूनही ही तपश्चर्येने पाच वर्षांच्या कुमारा प्रमाणे दिसणाऱ्या आत्मसाक्षात्कार संपन्न असल्याने निषेध करण्यास योग्य अशा चार सनकादिक दिगंबर ऋषींना अवलोकन करून

"अहो येथे वैकुंठात देखील यांचा उद्धटपणा आहे!"

असा त्यांच्या तेजाचा उपहास करून हातातल्या वेताच्या काठीने व "आत जाऊ नको" अशा आज्ञेने आत जाण्यास त्यांना प्रतिबंध केला. तेव्हा ऋषी त्यांना म्हणाले भगवद्भक्त वाचून वैकुंठात इतर कोणीही येत नाही. श्रीहरी अतिशय शांत पुरुष असल्यामुळे,त्यांच्या स्वरूपी विरोध नसल्यामुळे येथे भव्य शंकाच नाही. फक्त तुम्हालाच शंका येते की, की तुम्ही जसे कपटी आहात तसे इतरही कोणीतरी कपटी प्रवेश करतील यास्तव तुम्हीच लोक वंचक आहात असे भासते.तस्मात् वैकुंठ पालक परमात्म्याचे सेवक असूनही मंदबुद्धी अशा तुमचे कल्याण करण्यासाठी व या तुमच्या अपराधास योग्य शासन करण्यासाठी, भेदभाव मनात आणणाऱ्या पापी लोकांमध्ये काम क्रोध आणि शत्रू असतात, त्यामध्ये तुम्ही निघून जा. वैकुंठ सोडून तात्काळ चालते व्हा. असा शाप दिला. तेव्हा श्रीहरीच्या त्या दोघा द्वारपालांनी त्यांच्यापुढे अक्षरश: लोटांगण घातले. त्यावेळी श्रीहरी लक्ष्मीसह वर्तमान जेथे ऋषींना अवरोध झाला होता तेथे हे तात्काळ प्रकट झाले.

तेव्हा जय विजय यांनी श्रीहरीस शाप निवारण्याची विनंती केली असता भगवान म्हणाले की, ब्राम्हण हेच माझे परमदैवत आहे.जो माझ्या सेवकांनी तुमचा अनादर केला तो मीच केला असे मी समजतो.मी तुम्हापासी क्षमा मागतो कारण सेवकांनी अपराध केला असता लोक त्याच्या धन्याची नावे ग्रहण करतात. ते लोकांचे निंदावचन,जसा श्वेतकुष्ठ रोग त्वचेचा नाश करतो त्याप्रमाणे त्या स्वामीच्या कीर्तीस दूषण लाविते. माझी दोन मुख्य मुखे आहेत. एक ब्राह्मण व दुसरे अग्नि. त्यात ब्राम्हण हेच माझे मुख्य मुख होय माझ्या ठिकाणी सर्व कर्मफले अर्पण करून संतुष्ट असलेल्या व गळत असणाऱ्या घृता ने व्याप्त अन्नदिकांचा प्रत्येक ग्रास भक्षण करणाऱ्या ब्राम्हणाच्या मुखाने जसा मी संतुष्ट होतो. तसा यज्ञामध्ये अर्पण केलेले घृतादि होमद्रव्य भक्षण करीत असतानाही संतुष्ट होत नाही.

पातकामुळे ज्यांची विवेक दृष्टी नष्ट झाली आहे.असे जे लोक, माझे शरीर भूत जे ब्राह्मण, दूध देणाऱ्या गाई, आणि अनाथ प्राणी यांना माझ्याशी भेददृष्टीने अवलोकन करीत आहात त्यांना मी अधिकार दिलेल्या यमाचे गृद्ध रुपी दूत सर्पाप्रमाणे क्रुद्ध होऊन आपल्या  चोचेंनी फोडून टाकतात. तस्मात् या द्वारपालांनी आपल्या धन्याचा (माझा) ब्राह्मण विषयीचा हा अभिप्राय लक्षात न आणता तुमची अवज्ञा केली आहे म्हणून हे द्वारपाल अपराधास योग्य अशा दुर्गतीला तत्काल प्राप्त होवून पुन्हा माझा जवळ येवोत. भगवान विष्णू आपल्या सेवकांना म्हणाले की, जा. वैकुंठ लोक सोडा. तुम्ही काही भिऊ नका ब्राह्मणाच्या शापाचे निरसन करण्याविषयी मी इच्छित नाही. कारण तो  शाप मला मान्य आहे. नंतर तेथे देवश्रेष्ठ द्वारपाल ब्रह्मशापाने वैकुंठा पासून पतन पाऊ लागले तेव्हा त्यांचे सौंदर्य नष्ट झाल्यामुळे ते गर्व रहित झाले.  तेच हरीचे पार्षद जय विजय सांप्रतकाळी दितिच्या उदरामध्ये असलेल्या गर्भात प्रविष्ठ झाले. ती पतिव्रता दिति शंभर वर्षे पूर्ण झाली असता, जुळ्या दोन मुलास प्रसवली. तेच जय विजय हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु म्हणून जन्मास आले. त्यावेळी स्वर्गात पृथ्वीवर व आकाशात लोकांना भय उत्पन्न करणारे पुष्कळ उत्पात झाले. पर्वतासहित भूमीचे प्रदेश कंपायमान होऊ लागले. मोठ्या मोठ्या वृक्षांना उपटून पाडणारा सोसाट्याचे शब्द उच्चारण करणारा असा वारा वारंवार वाहू लागला. समुद्र एखाद्या खिन्न चित्त झालेल्या पुरुषासारखा घाबरून गरजू लागला. भालू, कोल्हे आणि घोडे ही कठोर शब्द करू लागली. जिकडेतिकडे श्वान केव्हा गायन केल्यासारखे केव्हा रडल्यासारखे अनेक प्रकारे ओरडत फिरू लागले. गर्दभाच्याच्या झुंडीच्या झुंडी कर्कश शब्दाने ओरडत सैरावैरा धावत सुटल्या. मेघ पुवाचा वर्षाव करू लागले. देवाच्या मूर्ती पासून अश्रुपात होऊ लागला. तिकडे ते दोघे आदिदैत्य उत्पन्न झाले तेव्हा त्या जुळ्या पुत्रांपैकी जो कश्यपाच्या देहापासून प्रथम गर्भ राहिला त्याचे हिरण्याकशिपू असे नाव ठेवले. आणि दिति ज्याला प्रथम प्रसवली त्याचे त्याचे हिरण्याक्ष असे नाव ठेविले. वराह अवतारामध्ये भगवंतांनी हिरण्याक्षाला ठार केले. पुढे

हिरण्याकशिपुने अकरा हजार पाच वर्षे तपश्चर्या केली. केवळ पाणी पिऊन दृढासान व इंद्रियांचा संयम त्यामुळे त्याचे व्रत दृढ झाले आणि तो तपश्चर्येत रममान झाला. समाधी योगाने ब्रह्मचर्याने व तसेच सर्व प्रकारच्या नियमाने ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि वर माग असे हिरण्याकशिपूला म्हणाले. तेव्हा सर्व  दैत्यांचा आदि पुरुष असलेला देवांचा शत्रू हिरण्यकशिपु :

न देवासुर गन्धर्वा न यक्षो रग राक्षसा:।

न मानुषा: पिशाचाश्च हन्युर्मा देव सत्तम।

..................

पशुभिर्वा मृगैर्न स्यात्पक्षिभिर्वा सरीसृपै:।

ददासि चेद्वरानेतान् देव देव व्रुणोम्यहं।

देव असुर गंधर्व यक्ष उरग राक्षस मानव व पिशाच यांपैकी कोणीही मला मारू नये.

हे लोकपितामह ! तपस्वी क्रुद्ध ऋषींनी सुद्धा मला शाप देऊ नये. शस्त्रास्त्रे, पर्वत, वृक्ष ओली किंवा कोरडी वस्तू किंवा अन्य कोणत्याही वस्तू ने मला मृत्यू येऊ नये. तर हाताच्या पंजाच्या एकाच प्रहाराने जो सेवक, सैन्य आणि वाहन यांनी युक्त असलेल्या मला मारण्यास समर्थ असेल त्याच्याकडूनच मला मृत्यू यावा. मीच सूर्य, चंद्र,वायू,अग्नी,जल,आकाश,नक्षत्रे,दाहीदिशा, क्रोध,काम, इंद्र, वरूण,कुबेर,यक्ष व किन्नपुरुष यांचा स्वामी व्हावे. ब्रह्मदेवाने हसत- हसत वर प्रदान केला व आशीर्वाद दिला की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. हिरण्याकशिपू वरदानाने गर्विष्ठ होऊन सर्व प्रजेला त्रास देऊ लागला. त्याने सर्वप्रथम आश्रमामध्ये व्रताचरण करणाऱ्या सत्य धर्मात राहून गेलेल्या जितेंद्रिय व महा भाग्यवान मुनींना त्रास दिला. त्याने दैत्यांना यज्ञभाग ग्रहण करणारे केले आणि देवांना यज्ञभागरहित केले तेव्हा देवांनी ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली विष्णूची प्रार्थना करून या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू यांनी त्यांना अभय दिले. स्वतः अर्ध्या मनुष्याचे व अर्धा सिंहाचे ,नीलमेघाप्रमाणे असणारे शरीर धारण करून ते हिरण्यकशिपूच्या सभेत आले. त्यावेळी हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला: हे मंदभाग्या माझा शिवाय असा तू जगाचा नियंता म्हणून सांगितलास तो कोठे आहे? तो सर्व ठिकाणी जर आहे तर मग या खांबामध्ये का दिसत नाही? तेव्हा व्यर्थ बडबड करणाऱ्या तुझे शीर मी आता धडापासून वेगळे करतो. तो तुझा आवडता हरी जर तुझे रक्षण करणार आहे तर त्यास आता येऊ दे.हिरण्यकश्यपूने सिंहासनावरून उडी टाकून आपल्या मुठीने आपल्या समोरील स्तंभावर (खांबावर) ताडन केले. "हे राजा!!!" तोच त्या खांबामध्ये अतिभयंकर असा ध्वनी उत्पन्न झाला व त्याच्या योगे ब्रम्हांडकटाह सुटलास की काय? असे सर्वांना भासले.पुत्र वधाची इच्छा धरून त्यासाठी आपल्या बलाने प्रयत्न करणारा तो हिरण्यकशिपु सभेमध्ये इकडे तिकडे पाहू लागला, पण तो आवाज कोठुन निघाला हे काही त्याच्या दृष्टीस पडले नाही. इतक्या मध्ये सर्व भूतमात्रांच्या मध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्तांनी केलेले भाषण सत्य करण्याकरिता अत्यंत अद्भुत रूप धारण करणारा भगवान श्रीहरी सभेमधील त्या स्तंभात प्रकट झाले.बाहेर निघणारे ते मनुष्याचे व सिंहाचे मिश्र रूप त्याच्या दृष्टीस पडले ते पाहून हा नरही नव्हे व सिंह ही नव्हे! तर हा कोण विचित्र प्राणी आहे?असा तो विचार करू लागला. त्याचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल असून मानेवरील आयाळीचे केस विजे प्रमाणे तळपत होते. त्याच्या दाढा भयंकर होत्या तलवारी सारखी व वस्ताऱ्याच्या धारे प्रमाणे तीक्ष्ण होती. त्याची नखे हीच जणू काही त्याची आयुधे होती. अशा स्वरूपाला पाहून हिरण्याकशिपू म्हणाला मायावी श्रीहरीने माझा मृत्यूचा उपायार्थ हे रूप घेतलेले दिसते. पण असे हे रूप माझे काय करणार आहे?असे म्हणत हातामध्ये गदा घेऊन गर्जना करीत तो दैत्यश्रेष्ठ नृसिंहाच्या सन्मुख वेगाने धावला परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो, त्याप्रमाणे नृसिंहाच्या तेजामध्ये पडलेला तो दिसेनासा झाला. त्या महा दैत्याने भगवंताच्या सन्मुख होऊन क्रोध पूर्वक आपल्या अतिवेगाने फिरवल्या गेलेल्या गदेने प्रहार केला. तेव्हा जसा गरुड मोठ्या सर्पाला पकडतो त्याप्रमाणे प्रहार करणाऱ्या त्या हिरण्याकशिपू ला नरसिंहाने त्याच्या गदेसह हाती धरिले. परंतु क्रीडा करणाऱ्या गरुडाच्या हातून जसा सर्प गळून पडतो त्याप्रमाणे  नृसिंहाच्या हातून तो सुटून गेला. नृसिंहाच्या हातातून सुटल्या बरोबर आपल्या बलाने नृसिह भयभीत झाला आहे असे मानून हातात ढाल व तलवार घेऊन मोठ्या वेगाने तो हिरण्याकशिपू त्या नृसिंहावर चालून गेला. पण शेवटी महा वेगवान नृसिंहाने तीव्र भयंकर असे हास्य करून सर्प जसा उंदराला पकडतो त्याप्रमाणे पकडले. ज्या हिरण्यकश्यपूच्या त्वचेला पूर्वी इंद्राचे वज्र देखिल छेदू शकले नव्हते असा तो महादैत्य भयभीत होऊन नरसिंहाचा हातून सुटण्याची धडपड करीत असता गरुड जसा अतितीव्र विषधारी सरपंचाचे ही विदारण करितो त्याप्रमाणे नरसिंहाने द्वारा मध्येच संध्याकाळचे समयी त्याला आपल्या मांडीवर उताणे पाडून नखांनी त्याचे हृदय विदारण केले. नंतर ज्याचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्याकडे अवलोकन करणेही कठीण झाले आहे. जो आपल्या जीभेने आपले विशाल ओठ चाटीत आहे.ज्याच्या मानेवरील केस व मुख ही रक्तलिप्त झाल्यामुळे लाल झाली आहेत. ज्याने दैत्यांच्या आतड्यांच्या माळा आपल्या कंठा मध्ये धारण केल्या आहेत. जो हत्तीचा वधाने शोभणाऱ्या सिंहाप्रमाणे भासत आहे आणि जो अनेक बाहूंनी युक्त आहे अशा त्या नृसिंहरूपी श्रीहरीने नखाग्रांनी त्या हिरण्याकशिपू चे हृदयकमळ विदारण केल्यानंतर त्याला मांडीवरून खाली टाकून दिले. नंतर ज्यांनी आयुधे उचलली आहेत अशा त्याच्या सेवकांना व त्याच्या मागून येणाऱ्या त्यांच्या पक्षपाती हजारो दैत्यांना नखरूप शस्त्रांनी व पायांच्या टाचांनीच मारून टाकले.नंतर ज्याचे उग्र तेज सर्वत्र पसरले आहे ज्याला कोणीच प्रतिस्पर्धी उरला नाही ज्याचे स्वरूप अतिभयंकर आहे हे असा तो प्रभू नरसिंह त्या राजसभेमध्ये राजसिंहासनावर बसला असता त्याचा स्तव करण्याकरिता त्याच्या जवळ जाण्याचे धैर्य कोणासही होईना. याचेच रसाळ वर्णन श्रीमद्भागवत आच्या द्वितीय स्कंध यामधील सातव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकामध्ये प्रतिपादित केले आहे ते पुढील प्रमाणे:

त्रैविष्टोरूपभयहा स नृसिंह रूपम्।

कृत्वा भ्रमद् भृकुटी दंष्ट्र कराल वक्त्रम्।

दैत्येन्द्रमाशु गदयाभिपतन्त मारा

दूरौ निपात्य विददार नखैः स्फुरन्तं।।१४।।

देवांच्या महा भयाचा नाश करणारा जो भगवान त्याने, भ्रमण पावणाऱ्या भुवया व दाढा यांनी भयंकर अशा मुखाने युक्त असे नृसिंह रूप धारण करून आपल्या समोर गदा घेऊन फुरफुरत येणाऱ्या दैत्यराज हिरण्याकशिपूला आपल्या मांडीवर पाडून त्याचे नखांनी शीघ्र विदारण केले. 

असो. मस्तकातील शूळ ज्याप्रमाणे नष्ट होतो त्याप्रमाणे आदिदैत्य हिरण्यकशिपूचा युद्धामध्ये श्रीहरीने वध केला.हे पाहून देवांगणा त्यांना नृसिंहावर पुष्पवर्षाव करू लागल्या.

प्रल्हाद म्हणाला वित्त, सत्कुलामध्ये जन्म, सौंदर्य, पांडित्य,इंद्रियसौष्ठव, कांती, प्रताप, शरीरशक्‍ती, उद्योग, बुद्धी आणि अष्टांगयोग हे बाराही गुण लोकांमध्ये व शास्त्रांमध्ये जरी श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत तथापि ते परमपुरुष भगवंताला संतुष्ट करण्यास समर्थ होत नाहीत असे मी मानतो.कारण केवळ भक्तीच्याच योगाने भगवान गजेंद्रा वर संतुष्ट झाला होता.या बारा गुणांनी युक्त परंतु पद्मनाभ भगवंताच्या चरण कमला पासून विमुख अशा ब्राह्मणापेक्षा त्या पद्मनाभाच्या ठिकाणी ज्याने मन, द्रव्य आणि प्राण हे अर्पण केले आहेत,त्या चांडाळाला सुद्धा मी श्रेष्ठ मानतो कारण तो चांडाळ हरिभक्तीमुळे आपले सर्व कुळ पवित्र करितो पण अतिगर्विष्ठ ब्राह्मणाला तसे करता येत नाही. 

म्हणून श्री भगवान म्हणतात

प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल: कलयतामहम्।

मृगाणांच मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्।।

( भगवद्गीता अध्याय १०. श्लोक ३.)

मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. पशूंमध्ये मृग राजा सिंह आणि  पक्ष्यांमध्ये गरुड आहे.

या नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मधील प्रल्हाद जागृत होवो. व सर्वांना नरसिंहाचे यथार्थ दर्शन घडवून त्याची जशी प्रल्हादावर कृपा झाली तशी आपणा सर्वांवर कृपा दृष्टी राहो. नरसिंह जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!

22 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
 • Instagram
 • Tumblr
 • Snapchat
 • Pinterest
 • Telegram
 • Gmail-logo
 • facebook
 • twitter
 • linkedin
 • youtube
 • generic-social-link
 • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.