हनुमान जयंती २०२४: मारुतीची जन्मकथाच निराळी!
Hanuman Jayanti 2024...कऱ्हबा रामायणात हनुमान शिव-पार्वतीचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. या रामायणातील कथेनुसार शिव-पार्वती अरण्यात...
हनुमान जयंती २०२४: मारुतीची जन्मकथाच निराळी!
Birth stories of Hanuman सर्वश्रेष्ठ रामभक्त म्हणजे हनुमान. हनुमानाच्या रामभक्तीचा महिमा वर्णावा तितका कमीच. हनुमान हा चिरंजीवी आहे. हनुमानाची जन्मकथा प्रचलित असली तरी विविध ग्रंथानुसार त्यात भिन्नता आढळते. किंबहुना जन्म तिथीतही हाच फरक आढळतो. हनुमान जयंतीच्या निमित्ताने याच कथा आणि तिथीतील भिन्नत्त्वाचा घेतलेला हा आढावा.
हनुमान जन्माच्या निरनिराळ्या कथा
वाल्मिकी रामायणात हनुमानाचे चरित्र सुंदरकांडा शिवाय किष्किंधाकांड, युद्धकांड, उत्तरकांड अशा तीन ठिकाणी आलेले आहे. किष्किंधाकांडात हनुमानाच्या जन्मकथेचा संदर्भ येतो. हनुमानाचा जन्म माता अंजनी आणि केसरी यांच्या पोटी झाला. हनुमान हा त्यांचा क्षेत्रज, तर वायूचा औरस पुत्र होता. माता अंजनी पूर्वजन्मी स्वर्गीची ‘पुंजिकस्थला’ नामक अप्सरा होती. एका ऋषींच्या शापामुळे तिने वानर योनीत जन्म घेतला होता. असे असले तरी स्वेच्छेने रूप धारण करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी होते. या जन्मी तिने महात्मा कुंजर नावाच्या वानरांची कन्या म्हणून जन्म घेतला होता. पुढे तिचा विवाह सुमेरूचा वानर राजा केसरी याच्याशी झाला आणि अंजनीला हनुमान पुत्ररूपाने प्राप्त झाल्याचा संदर्भ आहे. तर कऱ्हबा रामायणात हनुमान शिव-पार्वतीचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. या रामायणातील कथेनुसार शिव-पार्वती अरण्यात वानररूपात क्रीडा करत असताना, पार्वतीला गर्भ राहिला, पुढे हाच गर्भ वायूदेवाच्या मदतीने अंजनीच्या पोटी हलविण्यात आला. आणि हनुमानाचा जन्म झाला. वेत्तम मनीच्या पुराणिक एन्साक्लोपीडिया आणि भविष्य पुराणातही म्हणूनच हनुमान हा शिव आणि वायूचा पुत्र असल्याचे म्हटले आहे.
जन्म तिथीतही वेगळेपण
हनुमानजन्माच्या विविध कथा भारतभर प्रचलित आहेत. संपूर्ण भारताच हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. असे असले तरी रामायण आणि महाभारतात हनुमानाचा जन्म नक्की कोणत्या तिथीवर झाला याचा निर्देश नाही. त्यामुळेच ग्रंथापरत्त्वे आणि प्रांतभेदानुसार हनुमानाच्या जन्म तिथीत फरक आढळतो. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. तर आनंद रामायणात चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्रावर रिपुदमन हनुमानाचा जन्म झाला असे म्हटले आहे. अगस्त्य संहितेत मात्र कार्तिक वद्य चतुर्दशी, मंगळवारी, स्वाती नक्षत्र आणि मेघ नक्षत्रावर अंजनीच्या पोटी साक्षात भगवान शंकराने जन्म घेतल्याचे म्हटले आहे. अशा स्वरूपाचा संदर्भ शिवपुराणातही आढळतो. उत्सवसिंधू आणि व्रतरत्नाकर या ग्रंथांमध्येही हीच तिथी सांगितलेली आहे. तर सूर्यसंहितेते कार्तिक वद्यातील तिथी आणि वार शनिवार आहे. एकूणच हनुमानाच्या जन्म तिथीविषयी एक वाक्यता नाही, विशेष म्हणजे भारतात या सगळ्या तिथी प्रांतभिन्नत्त्वाला अनुसरून साजऱ्या केल्या जातात. आणि हनुमान भक्तांनाही तिथीच्या वेगळेपणाने फरक पडत नाही कारण या परमरामभक्तावर भक्तांचीही तेवढीच गाढ श्रद्धा आहे.
गृहस्थ हनुमान
महाराष्ट्रात हनुमानाच्या मंदिरात स्त्रियांचा प्रवेश निषिद्ध नाही. तरी उर्वरित भारतात विशेषतः उत्तर भारतात हनुमानाच्या मंदिरात स्त्रिया प्रवेश करत नाहीत. कारण हनुमान ब्रह्मचारी असल्याने स्त्रियांना प्रवेश निषिद्ध मानला गेला आहे. त्यामुळे प्रादेशिक विविधतेनुसार हा भेद का? हेही समजून घेणे गरजेचे आहे. हनुमान ब्रह्मचारी असला तरी, तो गृहस्थ असल्याचे उल्लेखही काही रामायणांमध्ये येतात. त्यातीलच एका प्रचलित कथेनुसार हनुमान लंकादहन करून परत येत असताना त्याचा घाम एका मगरीने गिळला आणि त्यापासून ती गर्भवती झाली. तिला पुत्ररत्न झाले, ज्याचे नाव तिने ‘मकरध्वज’ ठेवले. याविषयीचे संदर्भ आनंद रामायणाच्या सारकांडात आहेत. या रामायणातील कथेप्रमाणे अहिरावण-महिरावण वधाच्या प्रसंगी मकरध्वज आणि हनुमानाची भेट झाली होती. इतर कथांमध्ये मकरध्वजाचे नाव मत्स्यराज असे आढळते. भारताबाहेरील बहुतांश रामकथांमध्ये हनुमान हा गृहस्थच असल्याचे म्हटले आहे. जैन रामायणात हनुमानाला एक सहस्त्र पत्नी असल्याचे पं. महादेवशास्त्री जोशी यांनी संस्कृतीकोशात (खंड १०) म्हटले आहे. पौमचरीय, पद्मपुराणात अशीच मोठी संख्या देण्यात आलेली आहे.
हनुमान रुद्रावतार
हनुमानाला रुद्रावतार मानले जाते. स्कंदपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, नारदपूर्ण, शिवपुराण, भविष्यपुराण, महाभागवतपुराण या ग्रंथामध्ये हनुमानाचा संबंध रुद्राशी जोडण्यात आलेला आहे. एकूण अकरा रुद्र आहेत, हनुमानाची गणना एकादश रुद्रांत केली जाते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे, म्हणूनच हनुमानास भीमरूपी महारुद्र असे म्हटले जाते.
तेल-शेंदूर का प्रिय?
हनुमानाच्या रूपाविषयी निरनिराळे संदर्भ आढळतात. हनुमानाचे सर्वसाधारण रूप तांबड्यावर्णात असते. हनुमान हा रुद्रावतार आहे. रुद्र हा रक्तवर्णाचा असतो. वामदेव हा शिव अवतार रक्तवर्णीय होता. त्यामुळेच हनुमानालाही तांबड्या रंगात पूजले जाते, असे अभ्यासक मानतात. याशिवाय हनुमानाच्या सिंदूरप्रेमाचीही कथा प्रचलित आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला सिंदुराचा टिळा लावला, हनुमानाने यामागचे कारण विचारताच तिने स्वामींच्या दीर्घायुष्यासाठी हा टिळा लावते असे सांगितले. त्यानंतर हनुमानाने आपले संपूर्ण शरीर शेंदुराने माखले. तर दुसऱ्या एका कथेनुसार हनुमान द्रोणागिरी घेऊन लंकेला जात असताना, भरताने त्याला बाण मारला. त्यामुळे हनुमानाच्या पायाला जखम झाली, जी तेल आणि सिंदुराच्या लेपाने बरी झाली. त्यामुळे हनुमानाच्या मूर्तीला तेल आणि शेंदूर लेपन करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.
स्त्रिया पुत्रप्राप्तीच्या इच्छेनेही मारुतीची उपासना करतात. निपुत्रिक स्त्रिया भिंतींवर सिंदुराने मारुतीची आकृती काढतात आणि त्याची रोज पूजा करतात. त्याच्यापुढे कणकेचे दिवे लावतात. शनिवारी त्याच्या गळ्यात रुईच्या पानाफुलांची माळ घालून त्याला उडीद व मीठ अर्पण करतात. मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी अनेकजन मारुतीला नियमित प्रदक्षिणाही घालतात. एकुणात, हनुमान हा हाकेनिशी मदतीला धावून येणारा देव असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने हनुमान ही देवता जनमानसात लोकप्रिय आहे.
Comments