top of page
Search
Writer's pictureVedmata Gayatri J & D Kendra


शिव हे आपल्या दैवतमंडलातील एक आगळेच दैवत. एकाच वेळी शीघ्रकोपी आणि आशुतोषही. प्रसंगी आपल्या अर्धांगिनीशी सारीपाटाचा खेळ मांडणाऱ्या शिवाला एरवी रुचतो एकांतवासच. कदाचित म्हणूनच याची देवळेही पूर्वापार सुदूर व दुर्गम पर्वतराजींमध्ये वसलेली. भूतमात्रांपेक्षाही शिवाला अधिक प्रिय भूतगण. त्यामुळेच- ‘‘व्याघ्रचर्मधारी स्मशानी राहिला। संगे भूतमेळा विराजित।’’ अशा शब्दांत नामदेवराय या नि:संग देवराण्याचे रूपवर्णन करतात. शिव आणि शक्ती या उभयतांचे परस्परांवरील प्रेमही असाधारण असेच. या दाम्पत्याच्या अतीव परस्परानुरागाचे लोभसवाणे दर्शन ‘अमृतानुभवा’च्या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला घडवतात ज्ञानदेव. तर, महाभारतामधील सतीच्या आख्यानाद्वारे आपल्याला साक्षात्कार होतो तो या जोडप्याच्या उत्कट प्रेमाची घडी विसकटल्याने होणाऱ्या संहारक विस्फोटाचा. ब्रह्मदेवापासून निर्मिती मानल्या गेलेल्या दक्षाचा विवाह होतो स्वायंभुव मनूच्या प्रसूती नावाच्या मुलीशी. दक्ष आणि प्रसूती यांची एक मुलगी म्हणजे सती. तिचे लग्न होते शिवाशी. प्रजापतींचे मुखत्यारपद ब्रह्मदेवाने सुपूर्द केल्यामुळे छाती अंमळ फुगलेला दक्ष यज्ञाचा घाट घालतो. शिव व ब्रह्मा हे दोघे वगळता, सारी जीवसृष्टी त्या यज्ञाला हजेरी लावते. यज्ञात शिवाचा हर्विभाग स्वीकारण्यासाठी दक्षाच्या यज्ञस्थळी येण्याबाबत सती आग्रह करते आपल्या नवऱ्याला. पूर्वी अशाच एका यज्ञात दक्षाचे वितुष्ट आलेले असते आपल्या जावयाशी. त्या यज्ञमंडपात दक्षाने प्रवेश केल्यानंतर ब्रह्मा आणि शिव हे दोघे सोडून तिथे असलेले बाकी सगळेजण आदराने उठून उभे राहतात. शिव मात्र उत्थापन देत नाही म्हणून दक्षाच्या मनात अढी पूर्वीपासूनच असते. हा असा पूर्वेतिहास असल्याने यज्ञातील हर्विभाग स्वीकारण्यास जाण्याबद्दल शिव नकार देतो. हर्विभागाचा नवऱ्याचा डावलला गेलेला हक्क मागण्यासाठी सती वडिलांनी मांडलेल्या यज्ञस्थळी जाते. तिथे तिच्या पदरात दान पडते उपहासाचे. खुद्द तिचा जन्मदाताही सतीची मानखंडणा भर यज्ञमंडपात करतो. तो सारा अपमान असह््य झालेली सती त्याच यज्ञकुंडात उडी घेते. सतीने आत्माहुती दिल्याने संतप्त झालेला शिवशंकर यज्ञाचा पुरता विध्वंस घडवून आणतो वीरभद्राच्या माध्यमातून. या कथावस्तूला एक उपकथानकही आहे. ते असे की, पतीचा यज्ञीय हर्विभाग मागण्यासाठी यज्ञस्थळी निमंत्रणाविनाच आलेल्या सतीच्या पदरात उपहासाचे व अवहेलनेचे वाण पडते ते तिच्या नवऱ्याच्या रंगरूपापायीच. हाराप्रमाणे अंगावर शोभणारे नाग, सर्वांगाला भस्म, एका हातात डमरू, तर दुसऱ्या हातात खापर, गळ्यामध्ये रुळत आहेत रुंडमाळा… असे प्रगाढ वैराग्य मिरविणाऱ्या शिवाच्या असीम अनासक्तीची यथेच्छ निंदानालस्ती दक्षासकट सारेजण करतात. पतीचा तो घोर अपमान पाहून संतप्त झालेली मानिनी सती क्रोधातिरेकाने यज्ञकुंडात उडी घेते. शक्तीयुक्त शिवाच्या विश्वोत्तीर्ण व विश्वात्मक या उभय रूपांदरम्यानच्या नातेसंबंधांचे वर्णन- ‘‘पतीचेनि अरूपपणे। लाजौनि अंगाचे मिरवणे। केले जगा येव्हडे लेणे। नामरूपाचे’’ अशा रसोत्कट शब्दांत ज्ञानदेव करतात. विश्वोत्तीर्ण अवस्थेत केवळ स्पंदरूपाने विराजमान असणाऱ्या पतीच्या नि:संग रूपामुळे लोकव्यवहारात त्याचे कणमात्रही अवमूल्यन होऊ नये यासाठी, अनंत नामरूपांनी विनटलेला विशाल जगरूपी असा अमोल, अलौकिक दागिना अंगावर धारण करून शिवमय शक्ती जीवनसख्याबरोबर नांदते आहे, असे ज्ञानदेवांचे कथन!



23 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.