शास्त्र असे सांगते-
वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे?
उत्तर : काही जण वास्तुशांतीस पर्याय म्हणून सत्यनारायणपूजा करतात. नवीन घरात काहीतरी धार्मिक कार्य व्हावे व त्यानिमित्ताने संबंधितांना नवीन घरी निमंत्रित करता यावे म्हणून सत्यनारायणपूजा केली तर ते सयुक्तिक ठरेल. पण सत्यनारायणपूजा केल्यावर वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही असे कोणी प्रतिपादन करू लागला तर ती अज्ञानमूलक गैरसमजूत ठरेल. काही जण विधिपूर्वक वास्तुशांती करून त्या दिवशीच सत्यनारायणपूजा करण्याचा आग्रह धरतात. वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा केल्यास त्यापासून निराळे असे कोणते लाभ मिळतील असे मुळीच नाही. कारण सत्यनारायणाच्या वेळी मांडले जाणारे अष्टलोकपाल व नवग्रह वास्तुशांतीच्या वेळी ग्रहमखाच्या निमित्ताने आपोआपच पूजले जातात. शिवाय सत्यनारायणपूजेत ‘विष्णू' ही मुख्यदेवता असून ती वास्तुदेवतेच्या मानाने उच्चस्तरीय असल्यामुळे वास्तुशांतीच्या दिवशी कळत-नकळत विष्णुदेवतेला मुख्यत्व व वास्तुदेवतेला गौणत्व प्राप्त होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या हस्ते आयोजित केलेल्या उद्घाटनसोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहिल्यास जो प्रसंग ओढवेल तोच प्रसंग वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा ठेवल्यास ओढवू शकतो. शिवाय सत्यनारायण हा व्रतपूजेचा प्रांत आहे, तर वास्तुशांती हा याज्ञिकाचा प्रांत आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास यज्ञकार्य आणि पूजाकार्य ह्यांमध्ये यज्ञकार्य हे श्रेष्ठ मानले जाते. पण यज्ञकार्याच्या दिवशी पूजाकार्य आयोजित केल्यास मुख्यत्व आणि गौणत्व ह्यांचे निकष कार्यासाठी घ्यावयाचे की देवतेसाठी घ्यावयाचे ह्याबद्दलही गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
ह्यासाठी सुवर्णमध्य म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम केवळ घरच्या लोकांपुरता मर्यादित ठेवून त्यानंतर सोयिस्कर दिवशी परिचितांना व संबंधितांना निमंत्रित करून सत्यनारायणमहापूजा आयोजित करावी. त्यामुळे मुख्यपक्षाने वास्तुशांतीही उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होते व नंतर पूजेच्या निमित्ताने परिचितांनाही मान दिल्यासारखे होते.
Comentarios