top of page
Search

श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवणारी जगन्नाथ रथयात्रा ! १ जुलै ते १२ जुलै २०२२

पुरी (ओडिशा) येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा म्हणजे भगवान श्री जगन्नाथाच्या अर्थात् जगदोद्धारक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जणू महापर्वणीच ! केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांची रीघ असलेली ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवते. पुढील लेखात आपण या यात्रेची काही वैशिष्ट्ये पाहुया.




१. रथयात्रेमध्ये अग्रस्थानी श्री बलराम, मध्ये

सुभद्रा-देवी आणि मागे भगवान जगन्नाथ असा रथांचा क्रम असणे !

डावीकडून श्री बलरामाचा ‘तालध्वज’ रथ, मध्यभागी देवी सुभद्रेचा ‘दर्पदलन अथवा ‘पद्मरथ’ आणि तृतीय भगवान श्री जगन्नाथाचा ‘नंदीघोष’ किंवा ‘गरुडध्वज’ !

पुरी येथील जगन्नाथ मंदिर भारताच्या ४ पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्ण जगन्नाथाच्या रूपात विराजमान असलेले सध्याचे मंदिर ८०० वर्षांहून अधिक जुने आहे. भगवान श्रीकृष्णासह त्यांचे थोरले बंधू श्री बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रादेवी यांचेही येथे पूजन केले जाते. पुरी रथयात्रेसाठी श्री बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी ३ वेगवेगळे रथ सिद्ध करण्यात येतात. या रथयात्रेमध्ये सर्वांत पुढे श्री बलरामाचा रथ, मध्ये सुभद्रादेवी आणि सर्वांत मागे भगवान जगन्नाथाचा (श्रीकृष्णाचा) रथ असतो.

रथयात्रा मार्गस्थ होते तो भाविकांनी गजबजलेला मार्ग. रथयात्रेच्या काळात या मार्गावर आखलेल्याप्रमाणे श्रींचे तीनही रथ मार्गक्रमण करतात.


२. तिन्ही रथांना असलेली वैशिष्ट्यपूर्ण

नावे आणि त्यांची आगळीवेगळी वैशिष्ट्ये !

१. श्री बलरामांच्या रथाला तालध्वज म्हटले जाते. या रथाचा रंग लाल आणि हिरवा असतो. देवी सुभद्रेच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ असे म्हटले जाते. तो काळा किंवा निळा किंवा लाल रंगाचा असतो, तर भगवान जगन्नाथांच्या रथाला नंदीघोष किंवा गरूडध्वज असे म्हटले जाते. त्या रथाचा रंग लाल आणि पिवळा असतो.

२. श्री बलराम यांचा रथ ४५ फूट उंच, सुभद्रादेवीचा रथ ४४.६ फूट उंच, तर भगवान जगन्नाथ यांचा नंदीघोष रथ ४५.६ फूट उंच असतो.

३. हे तिन्ही रथ कडूनिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडांनी बनवण्यात येतात. यासाठी कडूनिंबाचे निरोगी आणि शुभ झाड निवडले जाते. त्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येते. या रथांच्या सिद्धतेत कोणत्याही प्रकारचे खिळे किंवा अन्य कोणत्याही धातूचा उपयोग करण्यात येत नाही, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

४. रथासाठी लागणार्‍या लाकडांची निवड मुहुर्तावर केली जाते. त्यासाठी वसंत पंचमीचा दिवस निवडला जातो. त्या दिवसापासून या लाकडांची निवड चालू होते. प्रत्यक्ष रथांच्या निर्मितीला अक्षय तृतीयेपासून प्रारंभ होतो.

५. हे तिन्ही रथ सिद्ध झाल्यानंतर छर पहनरा नावाचे अनुष्ठान करण्यात येते. या अंतर्गत पुरीचे गजपति राजा पालखीतून येऊन या तिन्ही रथांचे विधिवत् पूजन करतात. या वेळी सोन्याच्या झाडूने रथाचा मंडप आणि रस्ता स्वच्छ करण्याची प्रथा आहे.

६. यानंतर रथाचे प्रस्थान होते. आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेला रथयात्रेला आरंभ होतो. या दिवशी ढोल, नगारे, तुतारी आणि शंख यांच्या ध्वनीमध्ये भक्तगण हा रथ ओढतात. ज्यांना रथ ओढण्याची संधी मिळते, ते पुण्यवान असतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पौराणिक मान्यतेनुसार रथ ओढणार्‍याला मोक्षप्राप्ती होते.

३. मावशीकडे ७ दिवस मुक्काम करतात भगवान जगन्नाथ !

१. जगन्नाथ मंदिरापासून या रथयात्रेला प्रारंभ झाल्यावर पुरी शहरातून भ्रमण करून हे रथ गुंडीचा मंदिरात पोहचतात. येथे भगवान जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रादेवी ७ दिवस मुक्काम करतात.

२. गुंडीचा मंदिराला गुंडीचा बाडी या नावानेही ओळखले जाते. हे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर आहे. येथे विश्‍वकर्माने भगवान जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रादेवी यांच्या मूर्ती निर्माण केल्या होत्या.

३. रथयात्रेच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे पंचमीला देवी लक्ष्मी, भगवान जगन्नाथाला शोधत येथे येते. तेव्हा द्वेतापति दार बंद करतात. त्यामुळे देवी रुसून रथाचा पाय तोडते आणि हेरा गोहिरी साही (हे स्थळ पुरी येथेच आहे.) भागात असणार्‍या देवी लक्ष्मीच्या मंदिरात परत जाते.

४. त्यानंतर स्वत: भगवान जगन्नाथ रुसून बसलेल्या देवी लक्ष्मीची समजूत काढतात, अशी परंपरा आहे. या उत्सवाच्या माध्यमातून अशा प्रकारे एक अद्भूत भक्तीरस उत्पन्न होतो.

५. आषाढ मासाच्या १० व्या दिवशी हे रथ पुन्हा मुख्य मंदिराकडे प्रस्थान करतात. रथांच्या परतीच्या या यात्रेला बहुडा यात्रा म्हणतात.

६. श्री जगन्नाथ मंदिरात परतल्यावरही सर्व मूर्ती रथातच रहातात. त्यांच्यासाठी मंदिराची दारे दुसर्‍या दिवशी म्हणजे एकादशीला उघडली जातात. तेव्हा या मूर्तींना विधिवत् स्नान घालून वैदिक मंत्रोच्चारांमध्ये त्यांची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येते.

७. पुरीचा रथोत्सव हा एक सामुहिक उत्सव आहे. या काळात



पुरी येथे रहाणारे भाविक उपवास करत नाहीत.

समुद्र किनारी वसलेल्या पुरीमध्ये होणार्‍या भगवान जगन्नाथाच्या जगविख्यात रथयात्रेचे साक्षीदार होणे म्हणजे परमभाग्य समजले जाते. वर्षभर मनी याच भाव-भक्तीची साठवण करून भाविक पुढील वर्षीच्या रथयात्रेची मोठ्या आतुरतेने वाट बघतात. रथयात्रेच्या निमित्ताने पहायला मिळणारी ही श्रद्धा आणि भक्ती जगभरात कुठेच पहायला मिळणार नाही. म्हणूनच हा सोहळा दुर्मिळ आणि अद्वितीय आहे.


पुरी येथील जगन्नाथ मंदिराची अद्भूत आणि बुद्धीअगम्य वैशिष्ट्ये !

१. श्री जगन्नाथाचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. अनुमाने ८०० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिराचे वास्तुकौशल्य इतके भव्य आहे की, त्याविषयी संशोधन करण्यासाठी जगभरातून वास्तूतज्ञ या मंदिराला भेट देतात.

२. हे तीर्थक्षेत्र भारताच्या ४ पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

३. श्री जगन्नाथाच्या मंदिराची उंची २१४ फूट इतकी आहे. मंदिराचे क्षेत्रफळ ४ लाख वर्गफुटात पसरलेले आहे.

४. पुरी येथील कोणत्याही ठिकाणावरून मंदिराच्या कळसावर असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्यासमोरच असल्याचे जाणवते.

५. मंदिरावर असलेला झेंडा नेहमीच हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो. (प्रत्येक सूत्राचा बुद्धीच्या स्तरावर कीस पाडणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना हे मंदिर म्हणजे एक चपराकच आहे ! यातून हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्व लक्षात येते ! – संपादक) प्रतिदिन सायंकाळी मंदिरावरील झेंडा पालटण्यात येतो.

अजोड वास्तूशिल्पाचा नमुना असलेले हेच ते श्री जगन्नाथ मंदिर ! गोलात नेहमी वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फडकणारा मंदिरावरील ध्वज

६. सामान्यत: प्रतिदिन हवा समुद्राकडून भूमीच्या दिशेने येते आणि सायंकाळी त्याच्याविरूद्ध जाते; परंतु पुरी येथे त्याच्या उलट प्रक्रिया घडते.

७. मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी अदृश्यच असते.

८. येथे पक्षी किंवा विमाने मंदिरावरून उडतांना कधीही दिसणार नाहीत.

९. भोजनासाठी मंदिरात वर्षभर पुरेल इतकी अन्नसामुग्री असते. विशेष म्हणजे महाप्रसाद जराही वाया जात नाही. लाखो भाविक हा प्रसाद मोठ्या भक्तीभावाने ग्रहण करतात.

१०. या मंदिरातील स्वयंपाकघर हे जगातील कुठल्या मंदिरात असणार्‍या स्वयंपाकघरापेक्षा सर्वांत मोठे आहे. येथे महाप्रसाद करतांना मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. सर्व अन्न लाकडाद्वारे प्रज्वलित केलेल्या अग्नीवरच शिजवले जाते.

११. या विशाल स्वयंपाकघरामध्ये भगवान जगन्नाथाला आवडणारा महाप्रसाद बनवण्यात येतो. यासाठी ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० साहाय्यक एकाच वेळी सेवा करतात.

आशिया खंडातील सर्वांत मोठी पाकशाळा असलेले मंदिराचे स्वयंपाकघर. लाखो भाविक या पाकशाळेतील प्रसाद मोठ्या भक्तीभावाने ग्रहण करतात.




श्री जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य प्रथम अर्पण करण्यामागील कारण

कर्माबाई नावाची जगन्नाथाची मोठी भक्त होऊन गेली. ती गरीब असल्याने खिचडी बनवायची. भगवान जगन्नाथ प्रतिदिन सकाळी कर्माबाईच्या घरी खिचडी खाण्यासाठी जात असत. ज्या दिवशी कर्माबाईंनी देह सोडला, त्या दिवशी जगन्नाथाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते दृश्य सर्व पुजार्‍यांनी पाहिले. देवाने पुजार्‍यांना सांगितले, ‘‘कर्माबाई मला प्रतिदिन सकाळी खिचडी द्यायची. यापुढे मला खिचडी कोण देणार ?’’ तेव्हा सर्व पुजारी म्हणाले, ‘‘देवा, यापुढे आम्ही तुला प्रतिदिन खिचडीचा नैवेद्य देऊ.’’ तेव्हापासून श्री जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य प्रथम अर्पण करण्यात येऊ लागला.




8 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.