MangalaGauri Puja
मंगळागौर या व्रताची परंपरा महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांत आढळते.श्रावणात केले जाणारे मंगळागौरीचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साहाची, आनंदाची पर्वणीच. समवयस्क मैत्रिणींना, नातेवाईकांना जमवणे, पूजेचे विधी, गाणी, वेगवेगळे खेळ, थट्टामस्करी, खाणेपिणे, मैत्रिणींबरोबर जागरणे या सगळ्याला स्त्रियांच्या भावविश्वात खास स्थान आहे.श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना. ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ या कवितेतील वर्णनाप्रमाणे श्रावण हा कुंद पावसाचा मन प्रफुल्लित करणारा महिना. अशाच प्रफुल्लित चित्तवृत्तींनी येते श्रावणातील मंगळागौर. मंगळागौरीस धार्मिक व सांस्कृतिक अशी दोन अंगे आहेत. प्रस्तुत लेखात आपण मंगळागौरीची या दोन्ही अंगांनी माहिती घेऊ व हल्लीच्या जमान्यात त्याचे स्वरूप कसे बदलले आहे, यावरही नजर टाकू. नवविवाहितेने श्रावण महिन्यात करण्याची जी धार्मिक व्रते पूर्वापार चालत आली आहेत त्यातील शिवामूठ, गोपद्म यासारखेच मंगळागौर हे एक व्रत. मंगळागौर या व्रताची परंपरा महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांत आढळते. यात पूजाविधी व फलप्राप्तीचे सूत्र थोडय़ाफार फरकाने स्थलकालानुसार समान दिसते. उत्तर भारतात मंगळागौरीची मंदिरेही आहेत व तेथे श्रावण मंगळवारी जत्रा व उत्सव होतो. मंगळागौर हे प्रामुख्याने कौटुंबिक सुखसमृद्धीसाठी व्यक्तिगत पातळीवर करायचे व्रत आहे. मात्र महाराष्ट्रात या धार्मिक व्रताला सांस्कृतिक सामूहिकतेची अनोखी जोड लाभलेली दिसते. मंगळागौरीची ही सांस्कृतिक परंपरा, काळ झपाटय़ाने बदलत असला तरी, टिकून राहिली आहे. एवढेच नव्हे तर एरवी सर्वार्थाने आधुनिक व पाश्चात्त्य वळणाची जीवनशैली जगरहाटी म्हणून अनुसरलेल्या कुटुंबांमध्ये मंगळागौरीची ही सांस्कृतिक परंपरा जपण्याची व पुढे नेण्याची जाणीव आणि हौस दिसून येत आहे.वर म्हटल्याप्रमाणे मंगळागौर हे नवविवाहितेने करण्याचे व्रत आहे. हे व्रत नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी या भावनेने केले जाते. हे व्रत म्हणजे भगवान शंकराची पत्नी गौरी हिच्या पूजेचे व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केले जाते म्हणून त्यास मंगळागौरी असे म्हटले जाते. मांगलिक व्रत म्हणूनही त्यास मंगळागौर म्हणता येईल. हे व्रत नवविवाहितेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करायचे असते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची विधिवत पूजा करायची व पाचव्या वर्षी आईला वाण देऊन व्रताचे उद्यापन करायचे, अशी प्रथा आहे. रूढीनुसार एक मंगळागौर माहेरची व एक सासरची अशी साजरी केली जाते. व्यावहारिक सोय म्हणून दोन्हीकडची एकच मंगळागौरही अनेक घरांमध्ये एकत्रित स्वरूपात केली जाते. मंगळागौरीचे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र सामूहिक केली जाते. यात जिची मंगळागौर असेल तिच्यासोबत गावातील, नात्यातील, ओळखीपाळखीतील इतरही नवविवाहित मुलींना पूजेसाठी बोलाविले जाते. या सर्व मुली एक ते पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या असाव्यात. जिची मंगळागौर असते ती सोडून पूजेसाठी येणाऱ्या इतर सर्व विवाहित मुलींना ‘वशेळी’ असे म्हटले जाते. पूजेला किमान पाच किंवा प्रत्येकाच्या हौस व कुवतीप्रमाणे कमाल कितीही ‘वशेळ्या’ बोलवाव्यात. मुलीने लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी श्रावणातील एका मंगळवारी अशा प्रकारे वशेळ्यांना बोलावून सामूहिक मंगळागौर पूजन करावे आणि पहिल्या वर्षांतील इतर श्रावण मंगळवारी व नंतरच्या वर्षांतील श्रावण मंगळवारी इतरांच्या मंगळागौरीला ‘वशेळी’ म्हणून पूजा करण्यासाठी जावे. पाचव्या वर्षी पुन्हा उद्यापनाच्या वेळी आपल्याकडे वशेळ्या बोलावून मोठय़ा प्रमाणावर मंगळागौर करावी. काही कारणाने पाचव्या वर्षी उद्यापन करायचे राहून गेले तर नंतर केव्हा तरी सोयीनुसार ते केले तरी चालते. श्रावण महिना ‘अधिक’ आला तर अधिक श्रवणात मंगळागौर करीत नाहीत. मंगळागौर हे आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत असल्याचेही मानले जाते. म्हणूनच लग्नानंतरच्या पहिल्या वर्षीच्या श्रावणात पहिल्या मंगळवारी नवविवाहितेच्या माहेरी मंगळागौर करण्याची प्रथा रूढ झाली असावी. या वेळी आईवडिलांचा मान-सन्मान करून आशीर्वाद घ्यायचा असतो. नागदानाने संततीवर येणारे संकट टळते, अशी समजूत असल्याने या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी आईला नागप्रतिमेचे वाण देण्याची प्रथा आहे.पूर्वी घरे मोठी, ऐसपैस असायची, त्यामुळे मंगळागौर घरातच पुजली जायची. आता विशेषत: शहरांत गरजेनुसार हॉल किंवा एखाद्या मंदिराची जागा भाडय़ाने घेऊन मंगळागौर केली जाते. तसेच बहुतांश मुली हल्ली नोकरी लागल्याशिवाय लग्नच करत नसल्याने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करणे त्यांना शक्य होत नाही. तरीही पहिल्या वर्षी सोयीनुसार श्रावणातील एका मंगळवारी घरची एक मंगळागौर अवश्य केली जाते. मंगळागौरीच्या निमित्ताने सासर-माहेरच्या मंडळींखेरीज इतरही आप्तेष्ट जमतात व मुळात धार्मिक असलेल्या या कार्यक्रमास ‘कौटुंबिक स्नेहमेळाव्यां’चे स्वरूपही येते. गणपतीप्रमाणे मंगळागौरीच्या पूजेलाही २१ विविध प्रकारच्या झाडांच्या पानांची पत्री वाहण्याची पद्धत आहे. पत्री म्हणून वाहिली जाणारी ही पाने म्हणजे घराच्या परसदारात असलेल्या फुलझाडांची व औषधी वनस्पतींची पाने. नववधूने घरातील जाणत्या स्त्रियांसह परसदारात फिरून पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. त्यानिमित्ताने घराच्या परिसराची, तेथील वृक्षवेलींची व त्यांच्या गुणवैशिष्टय़ांची ओळख व्हावी, ही यामागची कल्पना. हल्ली निगुतीने सर्व पत्री गोळा करण्याचा उत्साह फारसा कोणी दाखवत नाही. बाजारात फुलांसोबत जे काही पत्री म्हणून मिळते त्यावर भागविले जाते. मंगळागौरीच्या दिवशी घरात पहाटेपासूनच लगबग सुरू होते. पूजा करणारी नवविवाहिता व घरातील इतर स्त्रिया शुचिर्भूत होऊन पूजेच्या तयारीला लागतात. पूजेनंतर नैवेद्य व जेवण असल्याने वशेळ्यांनाही लवकरच बोलावले जाते. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली यजमान नवविवाहितेसह वशेळ्या मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. पूजेनंतर आरती. प्रथम रिवाजाप्रमाणे गणपतीची व त्यानंतर मंगळागौरीची.. जय देवी मंगळागौरी, ओवाळिन सोनियाच्या ताटी, रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती, हिरे या मोती-ज्योति, मनोभावे करू आरती, जय देवी मंगळागौरी.. आरतीनंतर प्रथम गणेशाची व त्यानंतर मंगळागौरीची कहाणी सांगितली जाते. इतर कथांप्रमाणोच या कथेतूनही मंगळागौरी व्रताचे माहात्म्य सांगितले जाते व ते केल्याने कसे भाग्य उजळते याचे सोदाहरण वर्णन केलेले असते. यानंतर नवविवाहितेला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. एरवी नवऱ्याला अरे-तुरे करणारी आधुनिक नवविवाहिताही स्त्रीसुलभ लाजते व लाजत लाजत उखाणा घेते. कळी उमलते, खुदकन हसते स्पर्श होता वाऱ्याचा xxx रावांचे नाव घेते, आग्रह होता सर्वाचा! पूजा, आरती व कथेनंतर नैवेद्य व जेवण होते. मंगळागौरीला षड्रस अन्नाचा नैवेद्य असतो. सहा चवींचे अन्न योग्य त्या संतुलित प्रमाणात ग्रहण करावे, याचे प्रतीक म्हणून हा नैवेद्य. मंगळागौरीच्या वेळी आग्रहाने पाळली जाणारी आणखी एक बाब म्हणजे यजमान नवविवाहितेने व वशेळ्यांनी काहीही न बोलता मुक्याने जेवणे. जणू मूकपणाने एकमेकांना समजून घेण्याची कल्पना यामागे असावी. दुपारची जेवणे उरकल्यावर रात्रीच्या मंगळागौरीच्या खेळांची तयारी सुरू होते. त्यासाठी मंगळागौरीची पूजा केलेला चौरंग फुलापानांनी सजविला जातो व त्याला शिवलिंगाचे रूप दिले जाते. मनोभावे पुजलेल्या या शिवपार्वतीच्या साक्षीने रात्र जागविली जाते. पहाटेपर्यंत चालणारे खेळ हे मंगळागौरीचे खास मराठी अंग. त्याचा सविस्तर ऊहापोह या लेखाच्या उत्तरार्धात स्वतंत्रपणे करू. रात्रीचे खेळ सुरू होण्याआधी फराळ करून घेतात. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या मंगळागौरीत या फराळाचा मेनूही पूर्वापार ठरलेला असतो. स्वयंपाकाचे कंत्राट दिलेला केटरर माहीतगार असेल तर त्याला वेगळे काही सांगावे लागत नाही. रात्रीच्या फराळाचा हा मेनू रूढ होण्यामागेही आरोग्यशास्त्राचा विचार आहे. मुसळधार श्रावणसरींनी वातावरण कुंद झालेले असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पचायला सोपे जावे यासाठी भाजलेल्या आणि मोड आलेल्या धान्य-कडधान्यांचा यात समावेश केला जातो. मसालेभात, मटकीची उसळ, चटणी, गोड शिरा या नेहमीच्या पदार्थाखेरीज भाजणीचे खमंग वडे आणि त्यासोबत घट्ट कवडीबाज दही हे या मेनूचे फक्कड आकर्षण. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित मंगळागौरीत खेळले जाणारे खास स्त्रियांचे खेळ हे महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित आहे. अगदी पाच-सात वर्षांच्या मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या आजींपर्यंत सर्वच वयोगटांतील स्त्रिया यात उत्साहाने सहभागी होतात. काळ बदलत गेला तरी हे खेळ व त्यांची गाणी पिढीजात तशीच सुरू राहिली आहेत. पूर्वी मुलींच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात लग्ने व्हायची. हीच हौस या खेळांतून भागविली जायची. खेळांचे स्वरूप घरात खेळता येतील असे आणि स्त्रीसुलभ आहे. जुन्या-जाणत्या स्त्रियांकडून माहिती घेतल्यास या खेळांचे तब्बल ७२ प्रकार व उपप्रकार सांगितले जातात. प्रत्येक खेळाला लयबद्धता आहे व त्यासोबतची गाणी ही स्त्रीभावनांचे, तिच्या कौटुंबिक सुखदु:खांचे हे प्रतिबिंब आहे. नाचण्याचे अंग काहींना उपजतच असते. बॉलडान्स, साल्सा, कथ्थक, भरतनाटय़म्, ओडिसी हे नृत्याचे हल्ली सार्वजनिक स्वरूपात केले जाणारे प्रकार. पण पूर्वी असे नव्हते. घरांदाज मुलींनी नाचणे फारसे समाजमान्य नव्हते. मंगळागौरीच्या निमित्ताने ही हौस भागविली जायची. पण हे खेळ केवळ मौजमजेसाठी नाहीत. या खेळांतून आणि त्यासोबतच्या गाण्यांतून वागण्या-बोलण्याची, स्वत:चा आणि कुटुंबातील इतरांचाही तान-मान व तोल सांभालावा
5٬101٫00$Prezzo